‘ई-पीक पाहणी’साठी आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा


स्थैर्य, फलटण, दि. २० सप्टेंबर : खरीप हंगाम २०२५ साठी ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली पीक पाहणी नोंदवलेली नाही, त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.

शासनाच्या महसूल व वन विभागाकडून आलेल्या नवीन परिपत्रकानुसार, राज्यात ई-पीक पाहणीची गती अपेक्षित नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही अंतिम मुदतवाढ देण्याचे निश्चित केले. यापूर्वी ही मुदत २० सप्टेंबरपर्यंत होती.

‘डिजिटल क्रॉप सर्वे’ या ॲपद्वारे होणारी ही नोंदणी प्रक्रिया शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे, त्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले आहे.

शासनाने या योजनेची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, नोंदणी अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!