कृषी विभागाचा १७ वर्षांनंतरचा आकृतीबंध रद्द; दत्तात्रय भरणेंची घोषणा

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर कृषी विभागाचा वादग्रस्त आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १३ सप्टेंबर : कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या तीव्र विरोधानंतर १७ वर्षांनी तयार करण्यात आलेला २३ हजार ४७६ पदांचा वादग्रस्त आकृतीबंध मागे घेण्याची मोठी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने हा आकृतीबंध अधिकृतपणे रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गेल्या महिन्याभरापासून कृषी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आणि प्रशासनातील तणाव अखेर शांत झाला आहे.

कर्मचाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे माघार

ऑगस्ट महिन्यात मंजूर करण्यात आलेल्या या नव्या आकृतीबंधात तांत्रिक प्रवर्गावर अन्याय करून लिपिक संवर्गाला झुकते माप दिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने केला होता. शेताच्या बांधावरील प्रत्यक्ष मनुष्यबळ कमी करून आस्थापना शाखेत अतिरिक्त पदे निर्माण केल्याने पुण्यात धरणे आंदोलन व उपोषण सुरू होते. मंत्रालयात झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर करत आकृतीबंध लादणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली.

सर्वांना विश्वासात घेऊनच नवा निर्णय

जुना आकृतीबंध रद्द केल्यानंतर कृषी विभागातील सर्व संवर्ग, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन सर्वसमावेशक समिती स्थापन केली जाईल. शेतकरीहित आणि प्रशासकीय समतोल राखूनच नवा आकृतीबंध तयार करण्यात येईल, असे आश्वासन भरणे यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणी झालेल्या त्रुटींची योग्य ती चौकशी केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!