
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी, खटकेवस्ती, गवळीनगर, शांतीदास नगर येथे श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गोखळी आणि पंचक्रोशीतील श्री इच्छागिरी गुरु नागे महाराज मठ, बोनवटी (गोखळी) दुपारी १२ वाजता, पंचबिघा येथे सायंकाळी ६ वाजता श्री दत्त जन्मोत्सवा निमित्त भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शांतिदास नगर (गोखळी) येथे दुपारी १२ वाजता श्री दत्तजन्मोत्सव व सद्गुरू शांतीदास महाराज यांची ४५ पुण्यतिथी “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” गजरामध्ये भक्तिभावाने धार्मिक वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
उत्सवानिमित्त श्री दत्त व सद्गुरू शांतीदास महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फुलांची सजावट रांगोळी काढण्यात आली होती. श्री. दत्त जन्मोत्सव सोहळा व शांतीदास महाराज पुण्यतिथी सोहळा “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा” च्या गजरामध्ये जन्मोत्सव पार पडला. श्री दत्त जन्मोत्सव व शांतीदास महाराज पुण्यतिथी निमित्ताने दर्शनासाठी फलटण पूर्व भागातील खटकेवस्ती, पवारवाडी, जाधववाडी, आसू आणि फलटण – बारामती परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्यास या भागातील माहेरवाशीणी आपल्या मुला बाळांसह उपस्थिती लावतात. हे या भागातील उत्सवाचे वैशिष्ट आहे उत्सव काळामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मध्ये कीर्तन प्रवचन व ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीदत्त जन्मोत्सवा नंतर सुवासिनींनी श्रीदत्त जन्म पाळणा गायण केले. उत्सवसोहळ्याची सांगता ह. भ. प. नारायण महाराज जाधव आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
सर्व भाविक भक्तांसाठी दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप सायंकाळी ४ ते ६ वेळेत श्री दत्त व शांतीदास महाराज प्रतिमांची रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर सडा, रांगोळी काढून ठिकठिकाणी भाविकांकडून रथयात्रेचे नारळाची तोरण, गुलालाची उधळण करीत स्वागत करण्यात आले.
उत्सव सोहळ्यास दिवसेंदिवस यात्रेचे स्वरूप येत असून प्रतिवर्षी श्री दत्तजन्मोत्सव कालावधीमध्ये जनावरांचा बाजार सुरू करण्याचा मनोदय संयोजन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. तसेच गोखळी आणि परिसरातील वाडी वस्ती वर श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने श्रीपाद वल्लभ दिगंबरा गजराने अवघी गोखळी दुमदुमली.
फलटण पूर्व भागातील गुणवरे, मुंजवडी, निंबळक, मठाचीवाडी, साठे, राजाळे, बरड, वाजेगाव आदी ठिकठिकाणी भक्तीभावाने श्री दत्त जयंती उत्सव पार पडला.