दैनिक स्थैर्य | दि. 06 जानेवारी 2023 | फलटण | तालुक्यातील खामगाव येथील कातकरी समाजातील 60 बांधवांना फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याहस्ते घरपोच अनुसूचित जमातीचे जातीचे दाखले देण्यात आले आहेत. यापूर्वी या सर्व बांधवांना डोमसाईल दाखले, आधार कार्ड, मतदार कार्ड, उज्वला गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत.
या 30 कुटुंबांचा प्रत्येकी 500 चौरस फूट चां घरकुल जागा मागणी प्रस्ताव तयार करण्यात येत असुन त्यांना घरकुल ही दिले जाण्यासाठी तातडीने प्रयत्नशील राहू; असे आश्वासन यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले की; यामध्ये सदरील कुटुंबाना विविध योजनांच्या माध्यमातून वीज कनेक्शनसह सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. अनुसूचित जमातीच्या नागरिकांना हे लाभ देण्यात येत आहेत. समाजातील प्रत्येक कुटुंब विकासाच्या प्रक्रियेत सहभागी असावे हा हेतू आहे.
या नागरिकांचा बचत गट स्थापन करण्यात आला आहे. तसेच विमा, आरोग्यासाठी आयुष्मान भारत कार्ड, बँकेत खाते काढून देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचवण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व टीम सहभागी आहे. यामध्ये तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांचे मोलाचे योगदान आहे; असेही प्रांताधिकारी ढोले यांनी स्पष्ट केले.