दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सातारा । प्राचीन काळापासून महिलांकडे गुलाम म्हणून पाहिले जात होते. महिलांवर अनन्वीत अत्याचार होत होते. महिलांना अत्याचाराच्या, अन्यायाच्या जोखडातून छ. शिवाजी महाराज, म. ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यामधून मुक्त केले आहे. त्यामुळे गुरुवार, दि. ११ ऑगस्ट रोजी होणारा रक्षा बंधनचा उत्सव हा त्यांच्या प्रतिमेला राखी बांधून सातारा येथे साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्ष नागरिक संघटनेच्या सुनीता पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सहकार बोर्डाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी नीलिमा भिंताडे, शैला किर्दत, शैलजा कदम यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
सुनीता पाटणे म्हणाल्या, आमचे दक्ष नागरिक संघटनेच्या माध्यमातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. कोरोना काळातही अनेक कार्यक्रम घेण्यात आले. रक्षाबंधन निमित्ताने एक वेगळा कार्यक्रम घेण्याबाबत संघटनेच्या बैठकीत चर्चा झाली. ज्या महापुरुषांच्यामुळे आम्ही भगिनी आज उघडपणे समाजात फिरत आहोत. आम्हाला ज्यांच्यामुळे शिक्षण मिळाले. ज्यांच्यामुळे समाजात वावरण्याची संधी मिळाली. तेच महापुरुष आज आमचे खरे बंधू आहेत. त्यांनीच आम्हा महिलांवर्गाचे रक्षण केले आहे. त्यामुळे गुरुवारी होणारा रक्षा बंधनाचा सण हा त्यांच्या फोटोला राखी बांधून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, अर्चना वाघमळे, सातारा येथील तहसीलदार आशा होळकर यांच्यासह मान्यवर महिला अधिकारी उपस्थित राहणार आहेत.