दैनिक स्थैर्य | दि. २ मे २०२३ | फलटण |
चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी, तापी या व अशा राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रावरील नद्या कारखानदारी व महानगरांमुळे प्रदूषित झाल्या आहेत. ‘नमामी चंद्रभागा’ अशी आता केवळ घोषणा नको! या नद्या स्वच्छ करून शासनाने त्याचे पावित्र्य राखावे अन्यथा येत्या आषाढीत वारकरी आंदोलन उभे करू, असा इशारा भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्यावतीने अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरासमोर नदी प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणाला भागवत धर्म प्रसारक समिती व पालखी सोहळा पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष सूर्यकांत भिसे, सचिव अॅड. विलास काटे, अर्जुन मेदनकर, पाटोळे आदींनी साखळी उपोषणात भाग घेवून पाठींबा दिला.
सूर्यकांत भिसे म्हणाले, ‘चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान’. संतांनी तीर्थक्षेत्रावरील स्नानाला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. देहू, आळंदी, पंढरपूर आदी तीर्थक्षेत्रावर दररोज हजारो वारकरी येतात. पवित्र नद्यांत स्नान करतात, देवाचे, संतांचे दर्शन करतात आणि आपल्या घरी परततात; परंतु कारखानदारी, महानगरे यामुळे नद्या प्रदूषित होतात. त्यामुळे लाखो भाविक रोगराईला बळी पडतात. ‘नमामी चंद्रभागा’ ही नुसती घोषणा झाली; परंतु काम काहीच नाही.
शासनाने आषाढीपूर्वी या नद्यांचे शुध्दीकरण केले नाही तर आषाढीत वारकरी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भिसे यांनी दिला आहे.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आळंदी नगर परिषद नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध संस्था, संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, महाराज मंडळी व असंख्य वारकर्यांनी उपोषणस्थळाला भेट देवून आपला पाठिंबा जाहीर केला.