फलटणमध्ये संचारबंदी ही अफवाच : प्रांताधिकारी शिवाजी जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात कोरोना बाधीतांच्या संखेत चिंताजनक वाढ होत असतानाच अफवांनाही उत आलेला आहे. फलटण शहर बंद राहणार, संचारबंदी लागू होणार आदी अफवा सर्वत्र जोरदारपणे पसरल्या असल्या तरी फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी मात्र या अफवाच असून यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले असून अधिकृत घोषणेशिवाय नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले आहे.

फलटण शहरांमध्ये करोना बाधीतांचे प्रमाण वाढत आहे. दोन दिवसांपुर्वी शहरात बारा नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यानंतर, फलटण शहरासह फलटण लगतच्या उपनगरांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात येणार असल्याची अफवा सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून फिरू लागली आहे. या मुळे नागरीकांमध्ये गोंधळाचे व चिंतेचे वातावरण आहे. मात्र फलटण शहरामध्ये संचारबंदी घोषित करण्याचा कोणताही निर्णय विचाराधीन नसुन आगामी काळामध्ये जिल्‍हाधिकारी शेखर सिंग यांच्या सूचनेनुसार फलटण शहरामध्ये व तालुक्यामध्ये निर्णय घेण्यात येतील तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.

दरम्यान कोरोना विषाणूंचा संसर्ग शहर व तालुक्यात वाढत असताना सोशल मिडियावर अपुर्या अथवा ऐकीव माहितीद्वारे पोस्ट व्हायरल व फॉरवर्ड करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरत असून कोणतीही खातरजमा न करता सोशल मिडियावर अफवा पसरविणार्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सुजाण नागरिकांमधून होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!