सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची अबुधाबी फिल्म कमिशनला भेट; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आदान प्रदान व महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांची भेट घेऊन उभय देशादरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करण्यासंदर्भात, तसेच या क्षेत्रात महाराष्ट्रात गूंतवणूक करण्याबाबत चर्चा केली.

दुबई सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबई वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. चित्रपट, विविध प्रकारच्या मालिका, वेब सिरीज यांच्या चित्रीकरणसाठी सुलभ पद्धतीने ज्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत त्यांची माहिती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या अनुषंगानेच आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशन येथे भेट दिली. तेथील कमिशनर हन्स फारकीन यांच्याशी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती व्यवसाय संदर्भाने चर्चा केली. मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी नव्याने उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली. अबुधाबी फिल्म कमिशन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, या संदर्भाने महाराष्ट्रात दुबई येथून गुंतवणूक व्हावी याबाबतही चर्चा झाली.

अबुधाबी सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष मोहम्मद-खलिफा-अल-मुबारक यांचीही अमित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली. दोन्ही देशांना उपयुक्त ठरेल या पद्धतीने मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळ सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि दादसाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांच्यासह विस्टास मीडिया अबुधाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंत्तीखाब चौगुले, अबुधाबी फिल्म कमिशनचे  व्हाईस प्रेसिडेंट संजय रैना हेही सहभागी झाले होते.

अबुधाबी येथे चित्रीकरण झालेल्या एक था टायगर, विक्रम वेध या चित्रपटांच्या सेटला अमित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी चित्रीकरणाच्या आधुनिक व्यवस्था व कार्यपद्धतीचा अनुभव घेतला, अशा प्रकारच्या अद्ययावत माहितीचे अदान-प्रदान झाले तर भविष्यात दोन्ही देश या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय  कामगिरी करू शकतील अशी भावना श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!