शेततळे अस्तरीकरणातून बागायत फळपीक लागवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


पावसाळ्यात ओढे, नाले, नदी आदींद्वारे बरेच पाणी वाहून जाते. हे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करता येऊ शकते. यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाल्याने मिनाज मुजावर यांचा पिकाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

गुंजेगाव (ता. द. सोलापूर) येथील मिनाज इसमुद्दीन मुजावर यांनी भारतीय सैन्य दलात जवान म्हणून 16 वर्षे २ महिने सेवा बजावली आहे. त्यांच्या घरी आई व कुटुंबातील एकूण पाच सदस्य आहेत. गत वर्षी भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीची आवड असल्याने त्यांनी 3.19 हे. इतकी शेतजमीन खरेदी केली.

याबाबत श्री. मुजावर म्हणाले, सैन्य दलात सेवा बजावल्याने जय जवान जय किसान या उक्तीप्रमाणे व शेतीची आवड असल्यामुळे मी शेती कसत आहे. शेतीमध्ये फळबाग लागवड व ठिबक सिंचन करुन उपलब्ध पाण्यामध्ये मी बागायत शेती करित आहे. उन्हाळ्यामध्ये शेती व जनावरासाठी तीव्र पाणी टंचाई भासत होती. त्यामुळे शाश्वत पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. त्यासाठी 25x25x3.00 मी. आकारमानाचे शेततळे मी खोदलेले होते.

दरम्यान, कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत शेततळे प्लास्टीक अस्तरीकरण घटकासाठी अनुदान मिळत असल्याची माहिती श्री. मुजावर यांना मिळाली. त्यांनी त्यासाठी  सन 2022-23 वर्षासाठी ऑनलाईन अर्ज केला. ऑनलाईन सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर 25x25x3.00 मी. आकारमानाचे शेततळे प्लास्टीक अस्तरीकरण केलेले आहे.

श्री. मुजावर म्हणाले, माझ्यासारख्या नव शेतकऱ्याला कृषि विभागाने पूर्ण सहकार्य केले. शेततळे प्लास्टीक अस्तरीकरणसाठी मला एकूण रक्कम रु.58 हजार 700 अनुदान मिळाले आहे. सध्या उपलब्ध एका बोअरवेलद्वारे शेततळ्यामध्ये पाणी साठवणूक करत आहे. शेततळ्याच्या उपलब्ध पाण्यावर मी डाळिंब 0.80 हे, पपई 1.60 हे. बागायत फळपीक लागवड केलेली असून ठिबक सिंचनव्दारे पाणी व्यवस्थापन करत आहे. याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळण्यास अजून 4 ते 5 महिने अवधी असला तरी शेततळ्याच्याच जीवावर मी शेती करू शकत आहे. व शेततळ्यामुळेच आमचा उन्हाळा सुसह्य झाला आहे. सद्य स्थितीमध्ये शाश्वत पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे फळबाग व इतर बागायत पिकासाठी माझी पाण्याची समस्या सुटलेली आहे. मला या योजनेसाठी कृषि विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी मार्गदर्शन व मदत केलेली आहे.

सदर शेततळे अस्तरीकरणास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे व तालुका कृषि अधिकारी रामचंद्र माळी यांनी भेट देऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन केलेले आहे.

  • अविनाश गरगडे, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

Back to top button
Don`t copy text!