
दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२४ | फलटण |
ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे या शाळेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी व विद्यार्थ्यांना शिस्त आणि चारित्र्यसंपन्न घडवण्यासाठी कमांडो प्रशिक्षणाचे दर शनिवारी आयोजन करण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मर्दानी खेळ, सहासी खेळाचे धडे दिले जाणार आहेत. लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, रायफल परेड, ड्रिल, मार्च पास्ट मल्लखांब, दोरी मल्लखांब इत्यादी साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना योगा व जिम्नॅस्टिकचे सुद्धा प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी दिले जाणार आहे. विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा व त्याला संकटाच्या काळी स्वसंरक्षण करता यावे, हा कमांडो ट्रेनिंगचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, असे मत शाळेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे यांनी गुणवरे आणि परिसरातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष ईश्वर तात्या यांनी या उपक्रमाचे कौतुक करून उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दर्जेदार विद्यार्थी घडावेत म्हणून दरवर्षी शाळा राबवत असलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.