स्थैर्य, सातारा, दि. ८: लग्नसोहळा वा इतर कार्यक्रमास 50 लोकांची उपस्थितीची मर्यादा असताना नियम भंग केल्याबद्दल रविवारी सातारा पालिका व पोलीस प्रशासाने संयुक्त मोहीम राबवून एका सार्वजनिक कार्यक्रमासह लग्नसोहळ्यावर कारवाई केली. याप्रकरणी संबंधितांकडून प्रत्येकी दहा हजार असा 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासानाकडून ठोस पावले उचलण्यात आली आहे. लग्न सोहळा व सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली आहे. लग्न सोहळा व इतर कार्यक्रमासाठी केवळ पन्नास नागरिकांनाच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. असे असताना रविवारी दुपारी शाहूनगर येथे पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पन्नासहून अधिक नागरिकांनी हजेरी लावली. तर सदर बझार येथे पार पडलेल्या घरगुती विवाह सोहळ्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.
अशारितीने नियमांचे उल्लंघन केल्याने पालिका व पोलीस पथकाने संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. आयोजकांकडून प्रति दहा हजार असा एकूण वीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेचे कोरोना विभाग प्रमुख प्रणव पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी ही कारवाई केली.