दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२४ | फलटण |
सातारा शहरात मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेली लंडनच्या म्युझियममधून आणण्यात आलेली वाघनखे व इतर शिवकालीन वस्तू पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिक स्त्री-पुरुषांनी शनिवारी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी म्युझियमचे वाघनखे व प्रदर्शन पाहण्यासाठी शनिवारी दोन शाळांचे विद्यार्थी समूहाने आले होते. त्याचबरोबर स्त्री-पुरुष साधारणपणे पंधराशेच्या संख्येने आले होते. साधारणपणे तीन ते चार हजार जणांनी आज प्रदर्शन पाहिले. विद्यार्थ्यांना मोफतच प्रदर्शन आहे. १६ ते १७ हजार रुपये प्रदर्शन बघणारांकडून वस्तू संग्रहालयाला मिळाले अशी माहिती सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक ( क्युरेटर) प्रवीण शिंदे यांनी दिली.
ऐतिहासिक शाहूनगरीत पावसाचे प्रमाण जास्त असले तरी स्त्री पुरुष पावसापासून संरक्षण म्हणून छत्र्या घेऊनही प्रदर्शन व वाघनखे पाहण्यासाठी आले होते. जुन्या जागेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे नवीन जागेत कालच आल्याने व त्याचे उद्घाटन झाल्याने अनेकांनी वस्तुसंग्रहालयाची नवीन इमारत व प्रदर्शन पाहणे साठी गर्दी केली होती.