शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ऐच्छिक – कृषिमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 10 मार्च 2022 । मुंबई । आंबिया बहार सन 2021-22 मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत रायगड जिल्ह्यातील आंबा फळपिकासाठी 67 टक्के विमा दर प्राप्त झाला आहे. आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम रूपये 1 लाख 40 हजार प्रति हेक्टर असून रायगड जिल्ह्यात एकूण विमा हप्ता 67 टक्के प्रमाणे 93 हजार 800 प्रति हेक्टर इतका असून त्यांमध्ये केंद्र सरकारचा 12.50 टक्के हिस्सा आणि राज्य शासनाचा 33.50 टक्के हिस्सा तसेच 21 टक्के हा शेतकरी हिस्सा आहे. त्याचप्रमाणे, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मृग बहार योजना 2020 पासून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक करण्यात आली असून शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके व शेतकरी विमा हप्ता याबाबतची माहिती घ्यावी, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

राज्यातील फळपिक विमा योजनेबाबतची लक्षवेधी विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे, जयंत पाटील यांनी विचारली होती.

राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार 2016 पासून लागू करण्यात आली असून यात 2021-22 मध्ये मृग बहारामध्ये संत्रा, पेरू, चिकू, मोसंबी, डाळिंब, लिंबू, सिताफळ व द्राक्ष या फळपिकांसाठी तसेच आंबिया बहारामध्ये द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, काजू, स्ट्रॉबेरी व पपई या फळपिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली असल्याचेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या 18 जून 2021 च्या शासन निर्णयाअन्वये मृग व आंबिया बहार तीन वर्षाकरिता राबविण्याबाबत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई, एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि.मुंबई, भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई आणि रिलायन्स जनलर इन्शुरन्स कंपनी लि, मुंबई या विमा कंपन्यांना शासनाने मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!