दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सुधारित ज्वारी ‘फुले रेवती’ आणि गहू ‘एमएसीएस ६२२२’ या सुधारित वाणांच्या लागवड तंत्रज्ञानाचे पिक प्रात्यक्षिक व शिवार फेरीचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या चौधरवाडी प्रक्षेत्रावर करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. शरदराव रणवरे यांनी भूषविले. रब्बी ज्वारी आणि गहू पिकातील सुधारित लागवड तंत्रज्ञान, प्रगतशील शेतकर्यांचे अनुभव, तज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, फलटण भागातील शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रब्बी ज्वारी पिकातील प्रसिद्ध असलेला सुधारित वाण ‘फुले रेवती’ या वाणाची सुधारित लागवड तंत्रज्ञान व सरासरी ११५-१२० दिवसात तयार झालेली रब्बी ज्वारी व गहू पिकाचा ‘एमएसीएस ६२२२’ या सुधारित वाणाच्या लागवड तंत्रज्ञानाचे शेतीतील प्रत्यक्ष अनुभव, पिक प्रात्यक्षिक व शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकर्यांना सुधारित रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान व गहू पिकाचे लागवड तंत्रज्ञान मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. भास्कर कोळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण यांनी फलटण तालुक्यातील ज्वारीचे क्षेत्र व इतर पिकांचे बीज उत्पादन आणि पिक स्पर्धा तसेच शेतकर्यांनी सुधारित रब्बी ज्वारी आणि गहू लागवड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घ्यावे आणि सुधारित वाणांची लागवड करून उत्पन्न वाढण्यासाठी चालना द्यावी, असे आवाहन उपस्थित शेतकर्यांना केले.
प्रा. एस. एम. साळुंखे, सहायक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग, कृषि महाविद्यालय, फलटण यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना सुधारित ज्वारी फुले रेवती आणि गहु एमएसीएस ६२२२ या सुधारित वाणांच्या लागवड तंत्रज्ञान विषयी शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
महाबीज, सातारचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ए. एम. आष्टणकर यांनी महाबीज महामंडळाचे कार्य व फलटण तालुक्यातील चालू असलेले महाबीज महामंडळाचे उपक्रम या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले महाबीज महामंडळाचे पुणे विभागीय व्यवस्थापक श्री. लिलाधरजी मेश्राम यांनी सुधारित ज्वारी फुले रेवती आणि गहु एमएसीएस ६२२२ या सुधारित वाणांच्या लागवड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकर्यांनी भरघोस उत्पन्न घ्यावे, असे आवाहन शेतकर्यांना केले. तसेच महाबीज महामंडळाचे विविध पिकांचे सुधारित वाण व शेतकर्यांना बियाणे पुरविण्याचे कार्य व महाबीज महामंडळाचा इतिहास, हिरवळीचे खत पिके या विषयावर शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे चालू असलेले विविध कृषि पूरक प्रकल्प, चालू असलेले विविध उपक्रम, माती परीक्षण, विविध शेतकरी कार्यक्रम या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. शरदराव रणवरे यांनी शेतकर्यांनी विविध पिकांचे पिक प्रात्यक्षिक व शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकर्यांनी पिकाचे भरघोस उत्पन्न घ्यावे. तसेच महाबीज महामंडळ व कृषि विभाग आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांचे वेळोवेळी सहकार्य घ्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, श्री. सागर डांगे, तालुका कृषी अधिकारी, फलटण, श्री. सुनिल जाधव, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, सातारा, श्री. एस. एस. पारधे, कृषि क्षेत्र अधिकारी, सातारा, श्री. ए. ए. जगदाळे कृषि क्षेत्र अधिकारी, पुणे, श्री. सचिन जाधव, कृषि सहायक, सासकल, प्रा. जे. एस. माने, प्राचार्य, कृषि तंत्र निकेतन विद्यालय, फलटण, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, फलटण परिसरातील प्रगतशील शेतकरी श्री. भाऊसाहेब गुंजवटे, श्री. मुकुंद धनवडे, श्री. दत्तात्रय आवाडे व इतर शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्री. राजेंद्र पवार आणि श्री. विष्णुपंत रणवरे शेती विभाग, फलटण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजिंक्य रासकर यांनी केले व आभार प्रदर्शन कुमारी एम. पी. बांदल यांनी केले.