स्थैर्य, सातारा, दि. १२ : माण तालुक्यात अनेक गावांमध्ये वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडला. यात मूग, भुईमूग, मका, बाजरी, ऊस, जनावरांचा चारा, फुलशेती, भाजीपाला, शेती पिकाचे नुकसान झाले आहे. काही पिके पूणर्पणे भुईसपाट झाली तर काही पिके वाहून गेली आहेत. घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे पूल, रस्ते वाहून गेले आहेत. मोठ्या डौलात उभी असलेली हातातोंडाशी आलेली पिके काही क्षणात भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे स्वप्न भंग झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून लवकरात-लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने याअगोदर पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने शेतातील काही पिके शेतातच सडली आहेत. दुबार पेरणीसह अनेक संकटाशी सामना करत मशागतीला केलेला खर्च सुद्धा पाण्यात गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने होणार्या नुकसानाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
मागील 50 ते 60 वर्षात येवढा कधीही पाऊस झाला नाही. दुष्काळी भागात असा पाऊस होईल, असे देखील कोणालाच वाटले नसेल. या पावसामुळे शेतकर्यांच्या वेगवेगळ्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तरी पंचमाने करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी.
शेवरी गावातील युवा शेतकरी अमोल हिरवे यांनी शेतकर्यांचे झालेले नुकसान सांगण्यासाठी कृषी सहाय्यक व कृषिमंडल अधिकारी यांना फोन केले. मात्र त्यांनी लवकर फोन उचलले नाहीत. त्यानंतर त्यांनी अधिकार्यांच्या फोन न उचलण्याच्या प्रकाराला कंटाळून थेट कृषिमंत्री दादा भुसे यांना संपर्क साधला. कृषिमंत्री म्हणाले, मी तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश संबंधित खात्याला देऊन शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे सांगितले.