स्थैर्य, मुंबई, दि. २२: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकणच्या धावत्या दौऱ्यातून आपत्तीग्रस्त कोकणवासीयांच्या पदरी काहीच पडले नाही. आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री नुकसान भरपाई जाहीर करतील अशी अपेक्षा होती, मात्र नुकसान भरपाईची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. दरेकर बोलत होते.
श्री. दरेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भरघोस मदत जाहीर करतील अशी कोकणवासीयांची अपेक्षा होती. मात्र त्यांनी कसलीच मदत जाहीर केली नाही. नुकसानीचे पंचनामे करा एवढंच सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा अंदाज आलेला आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत द्यायला हवी होती. मात्र मदत जाहीर न करता मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या जनतेचा भ्रमनिरास केला. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीत आढावा बैठका घेतल्या. अशा बैठका मंत्रालयात, वर्षावरही घेता आल्या असत्या.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत कोकणचा दौरा करून आम्ही वादळाने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यात मच्छीमार, बागायतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आम्ही वस्तुस्थिती जाणून घेतली. दोन्ही विरोधी पक्षनेते 3 दिवस कोकणच्या दौऱ्यावर गेल्याने आपणही दौरा केला पाहिजे असे मुख्यमंत्र्यांना वाटले असावे म्हणून त्यांनी घाईघाईने 3 तासांचा कोकण दौरा केला. मात्र, या दौऱ्यात त्यांनी कोकणवासीयांच्या व्यथा – वेदना जाणून घेण्याचा प्रयत्नच न केल्याने हा दौरा म्हणजे केवळ देखावा होता, अशी कोकणवासीयांची भावना झाली आहे. एवढी मोठी आपत्ती येऊनही रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब रत्नागिरीत फिरकलेच नाहीत, असेही श्री. दरेकर यांनी नमूद केले.
कोकणच्या जनतेने शिवसेनेला आजवर भरभरून दिले आहे. त्याच कोकणच्या जनतेला शिवसेनेने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर जाहीर केलेली मदत अजूनही मिळालेली नाही. कोकणची उपेक्षा अशीच चालू राहिली तर कोकणच्या जनतेच्या संतापाला तुम्हाला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही श्री. दरेकर यांनी दिला.