स्थैर्य, विसापूर, दि.२१ : रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेल्या पुसेगाव-वडूज रस्त्याच्या दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या. रस्त्यावरील खड्डे भरले जाणार असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
वडूज ते पुसेगाव या 20 किलोमीटर अंतराच्या सतत रहदारी असणाऱ्या रस्त्यावर हजारो खड्डे पडले आहेत. खटाव ते पुसेगाव दरम्यान तर खोल खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खातगुण फाटा ते बस स्थानकापर्यंतचा संपूर्ण रस्ताच गायब झाला आहे. खटाव येथील डंगारे वस्तीनजीकही रस्त्याची वाट लागली आहे. महाविद्यालयाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या अरुंद पुलांवरील वाहतूक पडझडीमुळे धोकादायक बनली आहे.
वडूजमधून बाहेर पडल्यावर पेट्रोल पंपाशेजारीही रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. खड्ड्यांमुळे दररोज छोटे- मोठे अपघात घडत आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या. त्यानुसार येत्या दोन दिवसांत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले जाणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.