दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सातारा । महागाव (ता. सातारा) येथे पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी एकाला जबर मारहाण केली. त्यानंतर जखमीला उपचारासाठी घेऊन जाणार्यांवरही सहा जणांनी खूनी हल्ला केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी त्या सात जणांवर गर्दी-मारामारी, जबरी चोरी तर, सहा जणांवर खूनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल झाला आहे.
अमित चव्हाण, आशिष चव्हाण, रविराज चव्हाण, अर्जुन चव्हाण, अजिंक्य चव्हाण, मेहुल मोरे व सतिश नामदेव चव्हाण (सर्व रा. महागाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, साहिल अनिल चव्हाण (वय 21, रा. महागाव) याच्या फिर्यादीनुसार संशयितांवर जबरी चोरी व गर्दी-मारामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी घरात घुसून मला व दाजी मनोज धनवडे यांना काठी व पाइपने मारहाण केली. जखमी झाल्याने दवाखान्यात निघाल्यावर गाडीच्या काचा फोडल्या तसेच भांडण सोडवायला आलेल्या राजेंद्र चव्हाण यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून लंपास केला असे साहिल याने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार दगडे तपास करत आहेत.
दरम्यान, परस्परविरोधी फिर्याद प्रकाश शंकर चव्हाण (रा. महागाव, ता. सातारा) यांनी दिली आहे. त्यानुसार अमित चव्हाण, आशिष चव्हाण, संतोष चव्हाण, अर्जुन चव्हाण, मेहुल मोरे व सतिश नामदेव चव्हाण यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल सकाळी आठच्या सुमारास संशयीतांनी साहिल चव्हाण याला जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. त्याला उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यावर अर्जुन कशाला पोरांना मारतो, तु वडीलधारी आहे, कशाला भांडतो असे म्हणालो. त्यावरून संशयीतांनी त्यावेळी संशयितांनी काठने अन्य हत्याराने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याचे प्रकाश यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक बधे तपास करत आहेत.