दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । फलटण । आपणाविरुध्द वॉटस्ॲप ग्रुपवर बदनामीकारक व असभ्य भाषेत अपमानकारक मजकूर प्रसिध्द केल्याने व तो अन्य ग्रुपवर पाठविल्याची तक्रार दिगंबर रोहिदास आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे तीन कार्यकर्ते व एक अनोळखी इसम अशा एकुण चौघांविरुध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दिगंबर आगवणे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, नुकतीच त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेवून त्यात आगवणे यांनी त्यांच्या केलेल्या आर्थिक फसवणूकीचे वर्णन केले होते. तद्नंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही त्याच दिवशी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेनंतर त्यांचे कार्यकर्ते जगदीश तथा बाळासाहेब कदम रा. गिरवी ता. फलटण, यांनी भारतीय जनता पार्टी या वॉट्सॲप ग्रुपवर आगवणे यांच्यावर अपमानकारक व असभ्य भाषेत बदनामी करणारी पोस्ट टाकली. तसेच स्वागत काशिद रा. कोळकी ता. फलटण यांनी दोन वेगळ्या वॉटस्ॲप ग्रुपवर सांगायलाही लाज वाटेल अशी भाषा वापरुन त्यांची बदनामी केली. त्याच बरोबर वसीम इनामदार रा. काळज ता. फलटण यांनी त्या मेसेजला लाईक करुन ते फलटण तालुक्यातील अन्य ग्रुपवर पाठविले. याशिवाय एका अनोळखी इसमाने हे मेसेज बरोबर असल्याचे एका ग्रुपवर म्हटले आहे. या प्रकारावरुन दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन जगदीश तथा बाळासाहेब कदम रा. गिरवी, स्वागत काशिद रा. कोळकी, वसीम इनामदार रा. काळज ( तीघांचीही पुर्ण नावे माहित नाहीत ) व अन्य एका अनोळखी इसमावर ॲट्रोसिटी ( अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद झाला आहे.