स्थैर्य, सातारा, दि.२६: जिल्हा रुग्णालयात आढळलेल्या मृत अर्भकप्रकरणी गर्भपात करवून घेणार्या महिलेसह अज्ञात गर्भलिंग निदान करणार्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता राजेंद्र जाधव असे महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती, जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात एक स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले होते. तपासादरम्यान, ते अर्भक कविता जाधव या महिलेचे असल्याचे स्पष्ट झाले होते. सबंधित महिलेने तिला पहिल्या तीन मुली असताना प्रत्येक सोनोग्राफी करताना दोन मुली असल्याची खोटी माहिती दिली होती. दि. 27 जुलै 2020 रोजी रक्तस्त्रावाचा त्रास होत असल्याने संबंधित महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेस वॉर्ड नं. 7 मध्ये उपचारासाठी ठेवले होते. त्याठिकाणी ती शौचालयात गेली असता गर्भपात झाला होता. यानंतर काही दिवसांनी ते अर्भक सापडल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.
अज्ञात व्यक्तीमार्फत गर्भलिंग निदान करून गर्भपात करून मूल जीवंत जन्माला येण्यास प्रतिबंध केल्याप्रकरणी कविता जाधव यांच्यासह अज्ञात गर्भलिंग निदान करणार्यावर गुन्हा दाखल झाला आहे.