स्थैर्य, कातरखटाव, दि. 03 : जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग करुन बेकायदेशीररित्या जमाव जमवल्याप्रकरणी शिंगाडवाडी (कातरखटाव) ता. खटाव येथील दहा जणांवर वडूज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी: शिंगाडवाडी येथील एका मंदिरानजीक गेले काही दिवस बाळुमामाच्या मेंढराचा तळ आहे. या ठिकाणी सकाळ, संध्याकाळ धार्मिक कार्यक्रमाबरोबर मोठ्या प्रमाणावर अन्नदानही केले जात आहे. अन्नदानामुळे गर्दी वाढून कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रसार होवू शकतो अशी भिती एका अज्ञात व्यक्तीने वडूज पोलीसांना कळविली. त्याच्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक अशोक पाटील, बीट अम्मलदार शांतीलाल ओंबासे, पोलीस पाटलांना घेवून त्या मंदीरानजीक गेले. पोलीसांची चाहुल लागताच त्या ठिकाणी असणारे अनेक लोक पसार झाले. घटनास्थळी हजर असणार्या राजाराम मारुती शिंगाडे, प्रकाश महिपती शिंगाडे, शहाजी जगन्नाथ खरात, सचिन बबन शिंगाडे, राहुल तानाजी शिंगाडे, दादासाहेब राजाराम शिंगाडे, शंकर भास्कर शिंगाडे, विलास दादासाहेब शिंगाडे, शंकर भिकू जानकर रा. सर्व शिंगाडवाडी या नऊ जणांविरोधात पोलीसांनी भारतीय दंड कलम कायदा १८८, २६९, ५१ ब, ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर जागेवरुन सापडलेली काही वाहने पोलीसांनी जप्त केली आहेत.
कातरखटाव येथे आदल्या रात्रीच म्हणजे बुधवारी कोरोना पॉझीटीव्हचा रुग्ण सापडला आहे. अश्या परस्थितीतच एका जागृत इसमाच्या तक्रारीवरुन सदर कारवाई केली आहे. या कारवाईमागे जिल्हाध्यक्षांच्या आदेशाचे उल्लंघन व कोरोना दक्षता ही महत्वाची बाब आहे. – अशोक पाटील, पोलीस निरीक्षक, वडूज