दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । सातारा । माळ्याचीवाडी (ता.सातारा) येथील हॉटेल जलसागर मधुन साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात कोंडीराम रामचंद्र जानकर (रा. केळवली, ता.सातारा) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माळ्याचीवाडी येथे सागर अरुण कापसे यांचे जलसागर नावाचे हॉटेल आहे. सागर कापसे यांनी वडील अरुण यांचे १ लाख ७५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट, २८ हजारांच्या दोन अंगठ्या आणि दिड लाख रुपयांची रोकड हॉटेलमधील ऑफीसच्या लोखंडी कपाटात, तिजोरीत तसेच ड्रॉवरमध्ये ठेवले होते. या हॉटेलमध्ये कोंडीराम जानकर हा कामास होता. कामादरम्यान त्याने बनावट चावीने लोखंडी कपाट, तिजोरी तसेच ड्रॉवर उघडत आतील तीन लाख ५३ रुपयांचा ऐवज चोरुन नेला. हॉटेलच्या ऑफीसमध्ये असणारे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर सागर कापसे यांनी याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार कोंडीराम जानकर याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक दळवी हे करीत आहेत.