दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । सातारा । साताऱ्यात राहणाऱ्या एका विवाहितेची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी शैलेश प्रभाकर शेटे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार विवाहिता साताऱ्यातील समर्थ मंदीर परिसरात राहत असून मार्केटिंगच्या अनुषंगाने असणाऱ्या एका फेसबुक ग्रुपवर शैलेश प्रभाकर शेटे (रा. प्रथमेश अपार्टमेंट, जीवनज्योत हॉस्पिटल, बालविकास गणेश मंडळ, सातारा) याने महिलेचे छायाचित्र अपलोड करत आक्षेपार्ह शब्दप्रयोग केले. यानंतर या ग्रुपवर असणाऱ्या सभासदांनी त्यावर कमेंट करुन प्रतिसाद दिला. याप्रकरणी संबंधित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शैलेश शेटे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.