

स्थैर्य, सातारा, दि. ४: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले की, आयपीएलचे पुढील सत्र एप्रिलमध्ये सुरू होईल. कोविड-१९ मुळे यंदा लीग १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होत आहे. यादरम्यान इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे (ईसीबी) अध्यक्ष कोलिन ग्रेव्सने म्हटले की, बीसीसीआय त्यांच्याकडून हंड्रेड लीगबाबत माहिती घेत आहे. ईसीबी या वर्षी हंड्रेड लीगचे आयोजन करणार होता, मात्र कोरोनामुळे त्याला जुलै २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आले.
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून विश्वास दिला की, देशांतर्गत क्रिकेट तेव्हाच सुरू होईल, जेव्हा कोरोनानंतर वातावरण सुरक्षित होईल. ऑगस्टमध्ये नियमित घरचे क्रिकेट सुरू होते. मात्र, यंदा अद्याप सत्र सुरू झाले नाही. सत्राची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीने नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते. पत्रात म्हटले की, ‘मंडळ कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वातावरण चांगले होताच घरचे क्रिकेट सुरू करू. खेळाडूंसह लोकांचे आरोग्य व सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोविड-१९ च्या परिस्थितीत काही महिन्यांत सुधारणा होईल, असे वाटते.’
हंड्रेड लीगने रोमांच निर्माण केला : ग्रेव्स
ईसीबीचे अध्यक्ष कोलिन ग्रेव्सने म्हटले की, भारतासह अनेक देश स्वत:च्या हंड्रेड लीग बाबत विचार करत आहेत. लीगने सर्वांसाठी रोमांच निर्माण केला. ईसीबी क्रिकेटच्या नव्या चाहत्यांना जोडण्यासाठी हंड्रेड लीग सुरू करत आहे. मात्र, बीसीसीआयकडून त्याबाबत दुजोरा नाही. मंडळ सध्या आयपीएलमध्ये संघांची संख्या ८ वरून १० करण्याची तयारी करत आहे. राजस्थान रॉयल्सचे सहमालक मनोज बादलेने म्हटले की, ईसीबीने हंड्रेड लीगमध्ये भारतीय खेळाडूंच्या सहभागासाठी पुढे आले पाहिजे.
ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचा दौरा निश्चित
गांगुलीने सदस्यांना संघाच्या भविष्यातील दौऱ्याबाबत माहिती दिली. संघ वर्षा अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. त्यानंतर २०२१ ची सुरुवात इंग्लंडच्या यजमानात सुरू होईल. भारत पुढील वर्षी टी-२० विश्वचषक व २०२३ मध्ये वनडे विश्वचषकाच्या आयोजनाची तयारी करेल.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					 
					