स्थैर्य, फलटण दि.०७: कोरोनाग्रस्त मयतांचे अंत्यविधी होत असलेल्या कोळकी, ता.फलटण येथील रावरामोशी पुलानजिक असणार्या स्मशानभूमीला संरक्षित करण्याबाबत सहकार्य करण्याचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असणार्या ‘क्रेडाई’ फलटणच्या पदाधिकार्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘क्रेडाई’ फलटण ने या स्मशानभूमीच्या चारही बाजूंनी पत्र्याची संरक्षक भिंत उभारुन ही स्मशानभूमी बंदिस्त केली आहे.
गत काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्तांच्या स्मशानभूमीत एक मनोरुग्ण काहीतरी पदार्थ खाताना आढळून आला होता. त्यामुळे फलटण तालुक्यासह सर्वत्र एकच खळबळ माजली होती. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने सदरची स्मशानभूमी चारही बाजूंनी बंदिस्त करण्यासाठी मदतीचे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व डॉ.शिवाजीराव जगताप यांनी केले होते. सदर आवाहनाला ‘क्रेडाई’ फलटणने तात्काळ प्रतिसाद देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत ‘स्थैर्य’शी बोलताना ‘क्रेडाई’ फलटणचे अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक जावेदभाई तांबोळी म्हणाले की, ‘‘‘क्रेडाई’ फलटण गत वर्षापासून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात विविध माध्यमातून मदत करत आहे. कोवीड ग्रस्तांच्या स्मशानभूमीच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आल्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व डॉ.शिवाजीराव जगताप यांनी आवाहन केल्यानंतर तात्काळ आम्ही पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी अंदाजे 2 लाख रुपये खर्च करुन पत्र्याची संरक्षक भिंत उभारण्याचे काम केले आहे’’, असे सांगून ‘‘इथून पुढेही ‘क्रेडाई’ सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहील’’, असेही जावेदभाई तांबोळी यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदरच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन ‘क्रेडाई’ फलटणच्या पदाधिकार्यांना प्रशासनाच्यावतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व डॉ.शिवाजीराव जगताप यांनी धन्यवाद दिले.