दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२३ । सातारा । केंद्र शासनाकडून मिळणारा निधी समन्यायी व योग्य पद्धतीने वापरणारा जिल्हा अशी सातारा जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती ( दिशा ) ची सभा खासदार श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री सुरेशचंद्र काळे, किरण साबळे, सतेश कांबळे, बाळकृष्ण ननावरे, ॲड्. विनीत पाटील, अजय माने, मारुती मोळावडे, विश्वासराव भोसले, श्रीमती निलम ऐडगे, संगिता साळुंखे, समिद्रा जाधव आदींसह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र येत असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, अशासकीय सदस्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकी घ्याव्यात आणि त्यातून प्रश्न मार्गी लावावेत. जर समस्या सोडवण्याविषयी काही अडचणी असल्यास त्या आमच्याकडे द्याव्यात आम्ही केंद्रीय पातळीवर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. महामार्गावर असलेल्या पुलांवरील पथदिवे महामार्ग प्राधिकरणाने सुरू करावेत. तसेच या पथदिव्यांचे विजेचे देयक कोण अदा करणार हे ठरवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीसोबत बैठक घ्यावी. शाळा, पाणी पुरवठा योजना तसेच कृषि पंपांसाठी विद्युत पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी सौर पॅनेल बसवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. तसेच नागरिकांनीही घरातील सोहळ्यांच्या निमित्ताने एखादा सौर पॅनेल शाळा, पाणी पुरवठा यंत्रणा यांना दिल्यास विजेचा प्रश्न मार्गी लागेल. पाटण तालुक्यात मंजूर करण्यात आलेले 160 मोबाईल टॉवर दिवाळीपर्यंत कार्यान्वीत करावेत. पी.एम. किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा. दिशा समितीच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात असा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे. त्यासाठी अशासकीय सदस्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यास्तरावर एखादी समिती स्थापून प्रयत्न करावेत अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.
यावेळी अशासकीय सदस्यांनी टपाल खात्याकडील कर्मचारी व टपाल कार्यालये, शाळांविषयीचे प्रश्न, क्रीडा संकुल, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाबाबतचे प्रश्न, जल जीवन मिशन, ग्रामिण पाणी पुरवठा, स्वामित्व योजना, पी.एम.किसान योजना, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्ह्यातील रास्त भाव धान्य पुरवठा, याविषयीचे मुद्दे उपस्थित केले.