स्थैर्य, दि.३०: ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोरोना लस “कोविशील्ड’ची चाचणी करण्यात आलेल्या एका स्वयंसेवकाने आपल्यावर दुष्परिणाम झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्याने लसीचे उत्पादन करत असलेल्या सीरम इंडिया कंपनीकडे ५ कोटींच्या भरपाईची मागणीही केली आहे. मात्र, सीरमने हे सर्व आरोप फेटाळत प्रतिमा हनन केल्याप्रकरणी स्वयंसेवकावरच १०० कोटींचा दावा करण्याची तयारी सुरू केली आहे.
चेन्नईच्या या ४० वर्षीय स्वयंसेवकाने लस घेतल्यानंतर गंभीर न्युरोलॉजिकल व मनाेविकाराची लक्षणे दिसत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर कंपनीने म्हटले की, “त्या स्वयंसेवकाबाबत सहानुभूती आहे. मात्र त्याचे आरोप चुकीचे आहेत. लसीच्या चाचण्या व स्वयंसेवकाची प्रकृती यांच्यात काहीही संबंध नाही. आमच्या प्रतिष्ठेस ठेच पोहोचावी म्हणून हे आरोप केले जात असल्याचे स्पष्ट दिसते.’ चेन्नईच्या रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये १ ऑक्टोबरला “कोविशील्ड’च्या चाचण्या सुरू झाल्या होत्या.
डीजीसीआयकडून चौकशी सुरू, संबंधितांना बजावल्या नोटिसा
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने विविध संस्थांना नोटिसी बजावल्या आहेत. त्यात आयसीएमआर, सीरमचे सीईओ, ऑक्सफर्डमध्ये लस चाचणीचे प्रो. अँड्रयू पोलार्ड यांचा समावेश आहे. लस दिल्यानंतर संबंधित स्वयंसेवकाला खरेच त्रास झाला याची चौकशी केली जात आहे.