स्थैर्य , दि. २६: गेल्या वर्षभरात इटलीमध्ये कोरोनाने कहर केल्यानंतर, उमटलेल्या राजकीय पडसादांनंतर आता पंतप्रधान जीसेपे काँते पदावरून पायउतार होत आहेत. काँते यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. गेल्या आठवड्यात सिनेटच्या वरिष्ठ सभागृहात काँते यांनी आपले बहुमत गमावले होते. त्यानंतर त्यांना आपला राजीनामा दिला आहे. इटलीला कोरोनाच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला. इटलीत कोरोनाचे 85 हजार बळी गेले आहेत. युरोपमध्ये ब्रिटननंतर इटलीमध्ये सर्वाधिक कोरोना बळी गेले आहेत. तर, कोरोनाच्या मृतांच्या आकड्यात इटलीचा जगात सहावा क्रमांक लागतो. या सगळ्याचे राजकीय परिणाम दिसल्यानंतर काँते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला बहुमत सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळेल, अशी आशा काँते यांना आहे.