स्थैर्य, सातारा, दि. २० : सरकारने जसा अनलॉकचा निर्णय घेतला त्या दिवसापासून असंख्य लोक बाहेर गर्दी करताना दिसतात.लोकांची गर्दी पाहून असे वाटते, हा करोना गेला का?
आज पर्यंत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले. खरे म्हणजे ते घ्यावे लागले . योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळेच आज आपला देश इतर देशांच्या तुलनेत सुरक्षित आहे.आज करोनाने उग्र रूप धारण केले आहे. म्हणूनच तर सरकारला पुन्हा एकदा लॉकडॉउन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागला. तो ही सर्वांच्या हितासाठीच ना ! प्रमुख कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. कारण सर्व चक्र त्यावर अवलंबून आहे . दुसरा प्रमुख हेतू की, कोणाचीही उपासमार होऊ नये. एवढाच त्या मागील प्रामाणिक हेतू आहे.
जशा प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात तसेच काही निर्णयांचे देखील सकारात्मक व नकारात्मक पडसाद असतात. नाही का? त्यामुळे नेहमी सरकारला दोष देणे बरोबर नाही. जो पर्यंत लॉकडाउन होते ,तो पर्यंत सर्व आटोक्यात होते .मात्र अनलॉक होताच करोनाची संख्या वाढू लागली.त्यामुळे पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला. कारण दुसरा कोणताही पर्याय नाही. अहो ! सरकार तरी कुठपर्यंत पुरणार? ते तरी काय करणार? आपल्या देशाची लोकसंख्या एवढी आहे , प्रत्येकाच्या मागे लागायचे का ? आपली काहीच जबाबदारी नाही का? जर प्रत्येक व्यक्तीने स्वयंशिस्त पाळली तर ही वेळच येणार नाही. सर्व गोष्टी आटोक्यात येतील .नाही का? आजही पोलिसांना ओरडून ओरडून सांगावे लागत आहे, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टँसिंग पाळा, विनाकारण घराबाहेर फिरू नका म्हणून. नागरिक स्वयंशिस्त पाळत नसल्याने पोलिसांना नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागत आहे. यामुळे त्यांच्यावरील ताण वाढत आहे. सरकार देखील वेळोवेळी सूचना देत आहे की स्वच्छता राखा, वेळोवेळी हात धुवा, सॅनिटाइजरचा वापर करा, स्वतःची काळजी घ्या म्हणून. जर प्रत्येक कुटुंबाने आपली काळजी घेतली तर प्रशासनाचा ताण नक्कीच कमी होणार आहे.
सरकारने निर्बंध लावले तरच आपण सर्व गोष्टी करणार का ? अन्यथा नाही ? आपले हित कशात आहे हे ही लहान मुलांसारखे मोठयाना सांगायची वेळ आली आहे. मरणाच्या दारात ते केवळ आपल्या बेफिकीरिने उभे आहेत. मात्र काही लोकांना त्याचे काहीच गांभीर्य नाही.ही अतिशय वाईट गोष्ट आहे. जर मोठेच चुकीचे वागत असतील तर लहानांकडून काय अपेक्षा करणार? लहान मुले तर मोठ्यांचेच अनुकरण करतात ना? काही मंडळी तर निवांत मित्र-मैत्रिणींसोबत फिरतात, सहली काढतात ! अहो ही वेळ आहे का? स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे असे बेजबाबदार कसे वागू शकतात? आणि हो, त्यांना ह्या गोष्टीची अजिबात खंत नाही. कसलाही पस्तावा नाही. अनेक लोक मास्क न घालता बाहेर पडतात. डबल सीट प्रवास करतात. गप्पा मारतात. रोज भेटतात. गर्दी करतात. काही गरज आहे का त्याची ? जरा विचार करा, आजपर्यंत कधीही सरकारने आपल्यावर असे निर्बंध लावले होते का? नाही ना? आपल्याला जे पाहिजे होते तेच तर करत होतो ना? इतकी वर्ष आपलं आयुष्य आपण आपल्या मनासारखेच जगत होतो ना? थोडे दिवस थांबा. थोडा धीर धरा. थोडी सहनशीलता ठेवा. मग बघा, सगळे पूर्वीसारखे नक्कीच होईल. मात्र आज ही साखळी आपल्याला तोडायची आहे. सुखरूप ह्यातून बाहेर पडायचे आहे. तो दिवस ही लवकरच येईल. मात्र त्यासाठी ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढायची आहे. म्हणजे आपलं सरकार, डॉक्टर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी व आपण सर्व नागरिक मिळून.
अशी अनेक उदाहरणें आहेत, ज्यांच्या ऐका चुकीची शिक्षा त्यांच्या कुटुंबाला भोगावी लागली. त्यातील एक उदाहरण आवर्जून सांगावेसे वाटते. एक महिला मैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. येताना सोबत त्या अदृश्य करोनाला घेऊन घरी आली. थोड्या दिवसांनी तिला त्रास होऊ लागला. पूर्ण कुटुंबाची तपासणी करण्यात आली. त्यात तिच्या पतीलाही करोना झाला. परमेश्वराच्या कृपेने मुलाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र गोष्ट येथेच संपत नाही. आता त्या मुलाची जबाबदारी घेण्यासाठी कोणतेही नातेवाईक अथवा मित्र मंडळी तयार नव्हते. अक्षरशः हातापाया पडून एकाला कसे बसे तयार केले. आज आई वडील असताना त्याला परकेपणाची वागणूक मिळाली. त्या आईच्या चुकीची शिक्षा पूर्ण कुटुंबाला भोगावी लागली. अशी वेळ शत्रू वरही येऊ नये. आज माणुसकीचे नातेही हरवत चालले आहे. करोना योद्धाकडे जणू संशयीत नजरेने पाहिले जाते. त्यांना अस्पृशतेची वागणूक दिली जाते. किती चुकीचे आहे ! मात्र हे एक कटू सत्य आहे.
साधा थंडी ताप आला तरी आपले कुटुंब आपली काळजी घेतात. जवळ बसून असतात. मायेने व प्रेमाने हात फिरवतात. त्यामुळे तो मनुष्य लवकर बरा होतो.मात्र करोना झाल्यावर त्या व्यक्तीला कुटुंबापासून लांब रहावे लागते त्यांच्यात दुरावा येतो. आज मात्र डॉक्टर्स व नर्सेसने आपल्या घरच्यांची जागा घेतली आहे. ते सर्वांची खूप काळजी घेतात. काही त्यातून सुखरूप बाहेर पडतात. तर काही दगावतात. आज परिस्थिती एवढी बिकट आहे की, हॉस्पिटल्स भरली आहेत. डॉक्टर्स दिवस रात्र एक करून आपले कर्तव्य बजावत आहेत. अनेकांनी देशसेवेसाठी आपले प्राण ही गमावले आहेत. केवळ आणि केवळ आपल्यासाठी. त्यांना काही भावना नाही का? त्यांचे कुटुंब नाही का? एकीकडे ते मरणाच्या दारात उभे आहेत तर दुसरीकडे लोक निवांत फिरत आहेत. किती हा विरोधाभास ! जी व्यक्ती कामासाठी बाहेर पडते त्यांची गोष्ट वेगळी. कारण त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. त्यांच्या उदर निर्वाहाची जबाबदारी असते. मात्र आज असंख्य लोक बिनकामाचे फिरत असतात. त्यांच्या चुकीची शिक्षा ही केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर पूर्ण देशाला देखील भोगावी लागते.
रोज आपण वर्तमानपत्र वाचतो, बातम्या पहातो, हा करोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एक सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य व जबाबदारी देखील आहे की आपण सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. सरकारला घरात बसून साथ द्यावी. फक्त महत्वाच्या गोष्टींसाठीच बाहेर पडावे. जेणे करून लवकरात लवकर आपण ह्यातून बाहेर पडू व आपल्या स्वातंत्र्याचा आनंद पुन्हा घेऊ.
आज एकमेकांना नावे ठेवण्याची ही वेळ अजिबात नाही. तर एकजुटीने प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी निभावण्याशी शपथ घेऊ या. हीच खरी देशसेवा ! हीच खरी माणुसकी !
लेखन : रश्मी हेडे. -संपादन : देवेंद्र भुजबळ