स्थैर्य, सातारा, दि. 29 : एकीकडे मुंबईहून आलेले करोना बाधित होत असताना व त्यांची संख्या वाढत असताना जिल्हय़ात सर्व दुकाने सुरु झालीत. यामध्ये सलून व्यावसायिकांना देखील परवानगी मिळाली असली तरी त्यांच्यावर काळजी घेण्याबाबत प्रचंड बंधने आहेत. ग्राहकाबरोबरच स्वतःची काळजी घेवून काम करताना नाभिक कारागीर करोना योध्दे झाले आहेत. येणाऱया ग्राहकांची योग्य काळजी घेत त्यांचे केशकर्तन, दाढी करण्याचे काम सातारा शहरात सुरु झाले आहे.
सलून दुकाने सुरु करताना तिथे अनेक ग्राहकांशी येणारा थेट संपर्क हा धोकादायक आहे. मात्र ग्राहकाच्या अंगावर टाकण्याच्या कापडापासून ते केस कापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सॅनिटाईराईज करुन सलून व्यावसायिक कार्यरत झाले आहेत. केस, दाढी करताना ग्राहकाच्या अंगावर दरवेळी वेगळे युज अँड थ्रो कापड, पेपर नॅपकिन सह स्वतः काम करताना नाभिक कारागिर मास्क, चेहऱयावर शिल्ड घालून ग्राहकांना सेवा देत आहेत.
ग्राहक आल्यानंतर प्रथम त्याच्या हातावर सॅनिटर तसेच कपडय़ावर सॅनिटराईज स्प्रे मारण्यात येते. त्यानंतर मग युज अँड थ्रो टाईपाचे कापड अंगावर टाकून सॅनिटराईज केलेल्या साहित्याने केस व दाढी करण्याचे काम करण्यात येत आहे. यामध्ये मात्र हातात ग्लोज, चेहऱयावर मास्क व शिल्ड घालून काम करताना कारागीर घामाघूम होत आहेत. दरवेळी नवीन ग्राहकासाठी नवीन तयारी करताना त्यांची धावपळ उडत आहे. सॅनिटाईजच्या वासाने तसेच तेथे घेण्यात येणारी काळजी पाहून मात्र ग्राहकाला सलूनमध्ये आलोय की दवाखान्यात असेही वाटत असले तरी सध्या करोना च्या पार्श्वभूमीवर अशी काळजी घेणे आवश्यक बनलेय.
केस कापण्याचे व दाढी करण्याचे दर वाढवण्याबाबत आम्हाला फारसे स्वारस्य नव्हते. मात्र शासनाच्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र कापड, सॅनिटाईजचा वापर, साहित्य सॅनिटराईज करुन घेणे यासाठी खर्च वाढला आहे. त्यामुळे आमच्या नाभिक संघटनेच्या आदेशानुसार नवीन दरवाढ केली असली तरी ती ग्राहकांची काळजी घेण्यासाठीच आहे.