स्थैर्य, फलटण, दि. १ : मागील काही महिन्यांपासून कोरोनाला आळा घालण्यासाठी विविधांगी उपाययोजना शासनाद्वारे आखल्या जात आहेत. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्तरावर कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्यानंतरही अनेक ग्रामपंचायतींनी समित्या स्थापन केलेल्या आहेत. या समित्याचे गठण करण्यात आले असले तरी त्या नामधारीच ठरत आहेत. परिणामी कोरोना संसर्ग वाढत असताना ग्राम दक्षता समितीच्या निष्काळजीपणा मुळे तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होतोना दिसुन येत आहे. मागील वर्षी कोरोनाबाधित व्यक्ती जर आढळून आला तर लगेचच कटेंटमेंट झोनची अंमलबजावणी केली जात होती परंतू आता कटेंटमेंट झोन हे नावालाच राहिलेले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरातल्यांची सुध्दा आता चाचणी केली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसुन आलेले आहे. तरी तालुक्यातील सर्व गावातील कोरोना दक्षता समिती प्रमुखांची बैठक घेवुन तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने अनेक गावामध्ये भयान परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात रोज नवनवीन गावात कोरोनाची एन्ट्री होत आहे. असे असताना समितीचे तर सोडाच आरोग्य विभाग किंवा इतर सर्वच विभाग या वाढत्या रुग्ण संख्येला हलक्यात घेत असल्याने रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. अनेक गावात कोणतीही समिती गठीत करण्यात आली नसून प्रत्येक गावात कुण्याच्याही तोंडाला मास्क किंवा सामाजिक अंतर कुणीही पाळताना दिसत नाही. चहा, हॉटेल्स, पानटपऱ्या आदी ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत असून अनेक जण ग्रामस्थांसोबत हुज्जत घालत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत वाढच होत आहे. अनेक ठिकाणी समितीच नाही, असे सांगितले जात आहे.
ग्रामपंचायतींनी स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत गाव स्तरावर तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, आशा वर्कर, सरपंच, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलिस पाटील यांच्या माध्यमातून समिती स्थापन करून गावातील व बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात पाठविणे, किंवा कोरोना विषाणू संसर्गाची एखाद्या व्यक्तीला लक्षणे दिसल्यास वरिष्ठ पातळीवर कळविणे आवश्यक आहे. तसे आदेशही असताना ग्रामपंचायत अंतर्गत अद्याप अनेक गावात ग्राम समितीची स्थापना झालेलीच नाही व जेथे स्थापना झालेली आहे तेथे फक्त नावालाच कोरोना दक्षता समिती उरलेली आहे. तरी फलटण तालुक्यातील ग्रामदक्षता समित्या पुन्हा ॲक्टीव्ह करणे गरजेचे आहे.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोना दक्षता समितीचे संघटन करण्यात आलेले आहे. बर्याच गावांमध्ये अजुनही कोरोना दक्षता समितींची नियमित बैठक सुध्दा होत आहे. परंतू नागरिकांनी कोरोना दक्षता समितींना व प्रशासनला सहकार्य करणे आवश्यक आहे.
– डॉ. शिवाजी जगताप,
प्रांताधिकारी, फलटण
फलटण तालुक्यातील कोरोना दक्षता समित्यांची बैठक ही गेल्या आठवड्यापासून प्रत्येक आठवड्याला ऑनलाईन संपन्न होत आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना दक्षता समितीची आढावा बैठक ह्या आठवड्यात संपन्न झाली. त्यामध्ये कोरोना कश्याप्रकारे रोखता येईल या बाबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी कोरोना दक्षता समितीच्या प्रमुखांना सुचना दिलेल्या आहेत. आपल्या गावामधुन कोरोनाला कसा हद्दपार कसा करण्यात येईल याबाबत कोरोना दक्षता समितीच्या वतीने नियोजन करण्यात यावे.
– डॉ. अमिता गावडे – पवार,
गटविकास अधिकारी,
फलटण पंचायत समिती