स्थैर्य, मुंबई, दि.३०: कोरोना व्हॅक्सिन कधी
बाजारात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेनं आता
कोरोनाची लस आल्यानंतर तिची साठवणूक कुठे करायची याबद्दल जागाही निवडली
आहे. कोरोनाच्या लशीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून जगात थैमान घालणा-या कोरोनावर अखेर पुण्यातील सीरम
संस्थेनं लस शोधून काढली आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी
सीरम संस्थेची पाहणी केली आहे. त्यामुळे कोरोना व्हॅक्सिनचे बाजारात कधी
वितरण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मुंबई पालिकेनंही कोरोनाच्या
लस वितरणासाठी मोचेर्बांधणी केली आहे. मुंबई महापालिकेनं कोरोना लस
साठवणुकीसाठी कांजूरमार्ग ते भांडुप या परिसरात एका जम्बो कोल्ड स्टोरेजची
जागा निश्चित केली आहे.
लशीसाठी तापमान हे वेगवेगळ्या अंशावर ठेवावे लागते. त्याचबरोबर इतक्या
मोठ्या प्रमाणावर लशीची एका ठिकाणी साठवणूक करता यावी यासाठी महापालिका
पश्चिम पूर्व उपनगर आणि शहर परिसर अशा तिन्ही ठिकाणी जागेचा शोध घेत होती.
त्यापैकी भांडुप, कांजूरमार्ग या परिसरात आता जागेची निश्चिती करण्यात
आलेली आहे. शहरापासून जवळच असल्यामुळे मोठ्या वाहनांची ये-जा करण्यास सोईचे
ठरणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये आणि मुंबई बाहेर लशीचा पुरवठा
करण्यास सोपे ठरणार आहे.