‘लोकजागर’चे सातत्य कौतुकास्पद – श्रीमंत रघुनाथराजे

‘लोकजागर’च्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
कथा, कविता, लेख, व्यंगचित्र यांनी सजलेला, फलटण येथून गेली ४४ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणार्‍या यंदाच्या ४५ व्या ‘लोकजागर’ दीपावली विशेषकांचे प्रकाशन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते येथील ‘लोकजागर’ कार्यालयात संपन्न झाले. दीपावली विशेषांक प्रकाशनाचे ‘लोकजागर’चे सातत्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी श्रीमंत रघुनाथराजे यांनी काढले.

या कार्यक्रमास ‘लोकजागर’ चे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, फलटणमधील सुप्रसिद्ध डॉ. महेश बर्वे, डॉ. सुहास म्हेत्रे, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, कार्यवाह ताराचंद्र आवळे, मुधोजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, नवोदित लेखक गोपाळ सरक, पत्रकार बापूराव जगताप, विकास शिंदे, प्रदीप चव्हाण, अशोक सस्ते, विजय भिसे, प्रसन्न रुद्रभटे, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनिष निंबाळकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, उपशिक्षक अरुण खरात आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र हा मोठ्या संघर्षातून गेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात नाईक निंबाळकर घराण्याचं मोठं योगदान आहे. नऊ नाईक निंबाळकर रणांगणात वीरगती प्राप्त झालेले आहेत; परंतु इतिहासकारांनी या घराण्यावर कुठलाही समकालीन पुरावा नसताना खोटे आरोप केले. उच्च न्यायालयात जावून हा खोटा इतिहास पुसून टाकण्याचं काम मला करावं लागलं”.

‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणून श्रीमंत मालोजीराजे यांना योग्य न्याय रविंद्र बेडकिहाळ यांनी चरित्रलेखनातून दिला. रविंद्र बेडकिहाळ हे श्रीमंत रामराजेंच्याबरोबर नव्हते, म्हणून फलटण तालुका बर्‍याच गोष्टींना मुकला. शिवाय रामराजे आणि रविंद्र बेडकिहाळ जितके मोठे व्हायला पाहिजे होते, तितके मोठे झाले नाहीत. युक्ती, शक्ती आणि लेखणी बरोबर असती तर हा तालुका खूप मोठा झाला असता. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण या तालुक्याच्या विकासाचा आणि संघर्षाचा इतिहास पुढं आणा’, असेही आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी केले.

‘स्व. यशवंतराव मोहिते आणि स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने ४५ वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘लोकजागर’ चा प्रवास आजही सुरू आहे. फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या प्रजेला लाभ व्हावा म्हणून साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील नामवंत फलटणला आणले. त्यांची ही परंपरा आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ‘लोकजागर’ प्रकाशनच्या माध्यमातून सुरू ठेवली आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा मोठा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ फलटणमधून झाला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांना श्रीमंत मालोजीराजे यांनी संयुक्त महाराष्ट्र करावा लागेल हे पटवून दिले. श्रीमंत मालोजीराजे यांचे महाराष्ट्राच्या निर्मितीतील अशी अनेक कामे आपण शासनाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ योजनेअंतर्गत त्यांचे चरित्र लिहून पुढे आणण्याचे काम केले आहे. तथापि, प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नाईक निंबाळकर राजघराण्याच्या इतिहासाचे सविस्तर खंड आजवर प्रकाशित व्हायला पाहिजे होते”, अशी खंतही रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली.

‘यशवंतराव मोहिते, डॉ. पतंगराव कदम, श्रीमंत मालोजीराजे, दे. भ. रत्नाप्पाआण्णा कुंभार यांच्या तालमीत आमची विचारधारा वाढलेली असल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपक्रम आणि ‘लोकजागर’ची वाटचाल आम्ही अलिप्तपणे अखंड सुरू ठेवलेली आहे. श्रीमंत रघुनाथराजे हे परखड बोलणे आणि स्पष्ट विचाराच्या बाण्याचे आहेत. राजकारण, राजघराणं याहीपेक्षा कला, साहित्य याची अभिरुची असणारे आणि सतत इतिहासाचा मागोवा घेणारे हे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या हस्ते यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन होत आहे; ही आनंदाची बाब आहे”, असेही बेडकिहाळ यांनी आवर्जून सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्यवाह ताराचंद्र आवळे म्हणाले, ‘गेल्या ११ वर्षांपासून मी ‘लोकजागर’शी जोडलेलो आहे. ‘लोकजागर’मध्ये नेहमीच विविधांगी विचारांचा खजिना प्रसिद्ध होत असतो. हा खजिना भावी पिढीसाठी अतिशय मौल्यवान आणि दर्जेदार आहे.”

प्रास्ताविक व सूत्रसंचालन ‘लोकजागर’चे संपादक रोहित वाकडे यांनी केले. यावेळी श्रीमंत रघुनाथराजे यांचे स्वागत रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देवून करण्यात आले. अन्य उपस्थितांचे स्वागत ‘लोकजागर’च्या प्रकाशिका सौ. अलका बेडकिहाळ व महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!