दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । फलटण । सेंद्रिय शेती उत्पादनांना प्रोत्साहन देत असतांना ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे योग्य ती दक्षता घेण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सेंद्रिय अणि विषमुक्त शेती विषयक संबधीत बाबींवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत ना. राजेंद्र शिंगणे यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले, त्यावेळी राज्याचे कृषीमंत्री ना. दादा भुसे, सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, पशू संवर्धन व दुग्ध विकासमंत्री ना. सुनील केदार यांच्यासह महा ऑर्गनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) चे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्रदादा पवार, अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे, संजय देशमुख, अमरजित जगताप, कल्याण काटे, बाळासाहेब खेमणार, नितीन झगडे, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पदुमचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ, आयुक्त डॉ. परिमल सिंग, पदुम आयुक्त, कृषी आयुक्त , सहकार आयुक्त, एफ. एस. एस. ए. आय. च्या संचालिका श्रीमती प्रिती चौधरी, दिलीप झेंडे, निविष्ठा व गुणनियंत्रण – कृषि आयुक्तालय, पुणेचे संचालक सुनील बोरकर आणि कृषि अधिकारी उपस्थित होते.
डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, बाजारात अनेक अन्न पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून विकले जातात, मात्र ज्याच्या लेबलवर सेंद्रिय अन्नपदार्थ लिहिलेले असते त्यामध्ये तसे पदार्थ आहेत अथवा नाही याची खात्री नसते, त्यामुळे या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानके नियमन तयार केले आहे. यात जे अन्न पदार्थ सेद्रिय अन्नपदार्थ म्हणून पॅक करुन विक्री केली जाते त्या प्रत्येक पदार्थाला NPOP सर्टिफिकेशन यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच यावर ‘जैविक भारत’ चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा असे नियम आहेत. सदर नियमांची FDA मार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून नकली सेंद्रीय उत्पादनावर कारवाई केली जाईल. जनतेला अधिकृत सेंद्रिय उत्पादने मिळणेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील यासाठी आपल्या खात्यामार्फत आवश्यक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राज्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक : कृषीमंत्री दादाजी भुसे
सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक असल्याची माहिती कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांनी यावेळी दिली. परंपरागत शेती सोबतच कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी सेंद्रिय शेती साठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल. अन्न प्रकिया व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा त्याच बरोबर इतर अपारंपारिक भाजीपाल्याची ग्राहकांना ओळख व्हावी यासाठी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे ना. भुसे यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले.
गृहनिर्माण संस्थांमधून सेंद्रिय उत्पादनासंबधी जनजागृती करणार
सेंद्रिय उत्पादने योग्य ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार व पणन विभागातर्फे गृहनिर्माण संस्थांमधून जनजागृती करुन उत्पादनाविषयी माहिती देण्याबाबत योग्य नियोजन करण्याचे स्पष्ट संकेत सहकार व पणनमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीत दिले. पणन विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन विक्री प्लॅट फॉर्मवर सेंद्रिय शेती उत्पादनांना विक्रीसाठी खास व्यवस्था करण्याबरोबर विक्री मेळावे, प्रदर्शन आणि इतर उपक्रमातुन सेंद्रिय उत्पादनांबाबत प्रबोधन करण्याची ग्वाही यावेळी ना. बाळासाहेब पाटील यांनी.
दुधाळ जनावरांच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय चारा उपयुक्त
राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना दर्जेदार व अधिक दूध उत्पादनसाठी सेंद्रिय चारा उपयुक्त ठरेल असे सांगून त्यासाठी आपल्या विभागामार्फत प्रस्ताव तयार करण्याची ग्वाही पशू संवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना. सुनील केदार यांनी या बैठकीत दिली आहे.
सदर प्रस्ताव तयार करण्यासाठी मोर्फा पदाधिकारी व सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचे सूतोवाच यावेळी ना. केदार यांनी केले.
कोरोना नंतर प्रथीनयुक्त आहारांचे महत्व लोकांना पटल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली असल्याचे निदर्शनास आणून देत या विषयावर जनजागृती होत असल्याचे ना. केदार यांनी सांगितले. सेंद्रिय व विषमुक्त शेती या विषयावर अन्न व औषध प्रशासन, सहकार, पणन, पशू संवर्धन व दुग्ध विकास, तसेच कृषी विभागाची संयुक्त बैठक माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सेंद्रिय शेती धोरण, सेंद्रिय शेतमालाची विक्री व्यवस्था व इतर महत्वाच्या विषयांवर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर सेंद्रिय शेती उत्पादनांना निश्चित चांगले दिवस येतील त्यातून चर्चा झाली.