दैनिक स्थैर्य | दि. २२ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटणच्या बांधकाम क्षेत्रात विविध क्षेत्र आणि व्यवसायातील मंडळी सहभागी झाल्याने त्यांचा त्या त्या क्षेत्रातील अनुभव, दृष्टी, लोकांना सुविधा देण्याची भावना एकवटल्याने येथील बांधकामे दर्जेदार तर आहेतच, त्याशिवाय त्यामध्ये सौंदर्य आणि मानवी गरजांना अनुसरून केलेल्या सुविधांमुळे रहिवाशांना समाधान देणारी आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही बांधकामे असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जि.प. माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर सन २०२३-२४ मधील नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र सेंटरचे चेअरमन सचिन देशमुख होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. दिपक चव्हाण, महाराष्ट्र सेंटर रेरा समिती अध्यक्ष व माजी स्टेट चेअरमन रणधीर भोईटे, राष्ट्रीय सेंटर नियामक मंडळ सदस्य प्रमोदराव निंबाळकर, बारामती सेंटरचे उद्धव गावडे, सातारा सेंटरचे अनिल दातीर उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण हे छोटे गाव असले तरी गेल्या काही वर्षांपासून बिल्डर्स असोसिएशनसारख्या संस्था, संघटनांच्या सहकार्यातून त्याची शहरीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. शहरात उभ्या रहात असलेल्या इमारतींच्या स्वरूपावरून गावाचे सौंदर्य तर खुलतेच, त्याशिवाय गावातील सुबत्ता, संस्कृती यांचे दर्शन होते. फलटण बांधकाम क्षेत्रातील कल्पकता, गुणवत्ता, मजबुती वगैरे बाबतीत इतर शहरांच्या तुलनेत नेहमी आघाडीवर असल्याने येथे अपार्टमेंटला सुरुवात झाली त्यावेळची बांधकामे आणि आजची बांधकामे यामध्ये खूप मोठे बदल झपाट्याने झाले. त्यावेळी आणि आज इमारती उभारताना उत्तम साहित्य, दर्जेदार बांधकाम, सौंदर्यदृष्टी यामुळे इमारती अधिक चांगल्या आणि शहराचे सौंदर्य खुलविणार्या ठरत आहेत.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, आपली तरुण पिढी या क्षेत्रात येत असताना केवळ कुटुंबाचा व्यवसाय म्हणून त्यांना सामावून न घेता त्यांना पूर्णतः प्रशिक्षीत करून व्यावसायिक समस्या समजावून देवूनच या क्षेत्रात दर्जेदार व्यवसायाची परंपरा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आपल्यासमवेत काम करणारे प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, गवंडी, सुतार वगैरे सर्व घटक प्रशिक्षीत असले पाहिजेत, ही भूमिका घेऊन या सर्वांसाठी खास प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा घेण्याचा तसेच आपल्या सभासदांना बदलते कायदे, बांधकाम नियमावली, ग्राहकांच्या अपेक्षा यांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा घेतली जाते. ही बाब निश्चित अभिमानास्पद आहे. या प्रशिक्षणाद्वारे उत्कृष्ट कामगार घडविताना त्यांना स्व. अशोकभाऊ शिंदे यांच्या नावाने दि. १ मे रोजी ‘कामगार दिनी’ आदर्श कामगार पुरस्काराने सन्मानित करण्याची संकल्पना इतरांना प्रोत्साहन देणारी असल्याचे नमूद करीत ग्लोबल वॉर्मिंगच्या चर्चा सुरू असताना आपण वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात घेतलेली आघाडी प्रेरणादायी असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
केवळ ‘बांधकाम व्यावसायिकांची संघटना’ असे मर्यादित स्वरूप न ठेवता या क्षेत्रातील वीट, खडी, वाळू उत्पादक यांनाही सभासद करून घेऊन एकसंघ राहून दर्जेदार बांधकामे आणि ग्राहकांचे समाधान जपत विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न आणि त्यातून अनुभव संपन्न सभासद घडविताना राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या संघटनेचे नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण करून केवळ मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरातील नव्हे, आता तालुकास्तरावरही गुणवत्ता, क्षमता आणि कर्तृत्व असून संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील आजचा तरुणही राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्तम प्रकारे नेतृत्व करू शकतो, हे आपण रणधीर भोईटे यांच्यापासून ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्या सर्वांच्या माध्यमातून ग्रामीण कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे, असे श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले.
व्यवसाय करताना फायदा मिळालाच पाहिजे. तो मिळाला नाही तर व्यवसाय कशासाठी, असा सवाल करताना मात्र ग्राहकांना योग्य मोबदला व समाधान देणारा व्यवसाय फायद्याबरोबर आपल्यालाही समाधान आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद देणारा असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले, आपल्या व्यवसायात विश्वासार्हता निर्माण करून ती जपण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. मोठ्या उद्योगांनी निर्माण केलेल्या विश्वासार्हतेचा फायदा त्यांना सतत मिळत असल्याने त्यांची सर्व उत्पादने लोकप्रिय ठरतात. तीच भावना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक विचाराने या व्यवसायात निर्माण केली तर ती विश्वासार्हता उपयुक्त आणि फलटणचा नावलौकिक सार्थ ठरविणारी ठरेल.
‘छोटे टुमदार बंगले’ ही सातारा, फलटणची ओळख आज मागे पडत असल्याची खंत व्यक्त करताना, वाढत्या लोकवस्तीला पुरेशी घरे उपलब्ध करून देताना बहुमजली अपार्टमेंट संकल्पना पुढे आल्याचे निदर्शनास आणून देत शहरात हे शक्य नसले तरी शहरालगत विकसित होत असलेल्या कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी परिसरात ‘बंगलो स्कीम’ शक्य असून त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
पर्यावरणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन कमी वीज वापर, कमी कार्बन उत्पादन, भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा अशा स्वरूपाच्या ‘इको फ्रेंडली’ इमारती उभारण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या एकूणच कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वांचे कौतुक केले.
तालुक्याच्या ठिकाणी शहरातील मोठ्या सेंटरला लाजवेल असे विविध उपक्रम राबवून उत्कृष्ट काम करणार्या ‘फलटण सेंटर’चा बोलबाला आता राज्यातच नव्हे, देशपातळीवर पोहोचला असल्याचे सांगत ‘स्टेट सेंटर’चे चेअरमन सचिन देशमुख यांनी ‘फलटण सेंटर’च्या कामाचे कौतुक करीत नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.
तालुक्याच्या ठिकाणी स्व:मालकीच्या देखण्या वास्तूमध्ये कार्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि दर्जेदार काम करताना ‘स्फूर्ती व इको विंग’ ही सक्षम करण्याचा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे सांगत ‘स्टेट चेअरमन’ म्हणून आणि तुमचा मित्र सहकारी म्हणून कोणत्याही समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण २४ तास उपलब्ध असल्याची ग्वाही अध्यक्षीय भाषणात सचिन देशमुख यांनी दिली.
फलटणकरांना अभिमान वाटावा, असे उत्तम काम राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचवून राज्याचे नेतृत्व सक्षमपणे करताना फलटणचे वेगळे वलय बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून राज्य स्तरावर निर्माण केल्याचे गौरवोद्गार व्यक्त करीत आ. दिपक चव्हाण यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.
गेल्या ३०-३२ वर्षात कृषी, औद्योगिक विकासाबरोबच संपूर्ण तालुक्यात पायाभूत सुविधांची उभारणी उत्तम प्रकारे करून तालुक्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीद्वारे तालुका सर्वार्थाने आघाडीवर नेल्याने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत विश्वजितराजे यांनी केलेले काम निश्चित प्रेरणादायी आहे. या कामात बिल्डर्स असोसिएशनची साथ मोलाची असल्याचे आ. दिपक चव्हाण यांनी सांगितले.
‘फलटण सेंटर’ स्थापनेपासून उत्तम काम, सर्वांना सामावून घेऊन उपयुक्त उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यशस्वी होत असताना गतवर्षी राजीव नाईक निंबाळकर व त्यांच्या सहकार्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अनेक उपयुक्त व समाजहिताचे उपक्रम राबवून नवा आदर्श निर्माण केला. आगामी वर्षभर आपण व सहकारी सर्वांच्या सहकार्याने त्यामध्ये अधिक योगदान देवून ‘फलटण सेंटर’ अधिक सक्षम, लोकाभिमुख, दर्जेदार करण्याची ग्वाही नवनिर्वाचित चेअरमन किरण दंडिले यांनी दिली.
स्थापनेवेळी १६-१७ असलेली सभासदसंख्या आता १०० पेक्षा अधिक असताना ‘स्फूर्ती’ व ‘इको’ या दोन विंगच्या माध्यमातून मोठी ताकद निर्माण झाल्याने या ताकदीच्या माध्यमातून आणि ‘बेस्ट स्टेट चेअरमन’ पुरस्कार प्राप्त आमचे सभासद रणधीर भोईटे, विद्यमान स्टेट चेअरमन सचिन देशमुख आणि आमचे सर्व आजी-माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण सेंटरचे काम अधिक प्रभावी, उपयुक्त आणि सर्वांना दिलासा देणारे करण्याची ग्वाही देत चेअरमनपदाची जबाबदारी विश्वासाने सोपविल्याबद्दल किरण दंडिले यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रारंभी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, स्टेट चेअरमन सचिन देशमुख, आ. दिपक चव्हाण, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे पदग्रहण, नव्याने सभासद झालेल्या सदस्यांचे स्वागत आणि फलटण सेंटरच्या सोशल मीडिया पेजचे लोकार्पण समारंभपूर्वक करण्यात आले.
कार्यक्रमास सातारा सेंटरचे रामदास जगताप, राजेश देशमुख, कालिका स्टीलचे श्रीकांत जाधव, राष्ट्रीय नियामक मंडळ सदस्य प्रमोद निंबाळकर, क्रेडाईचे महेंद्र जाधव, अनिल निंबाळकर, कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे, पाक्षिक महामित्रचे दशरथ फुले, श्रीकृष्ण देवस्थानचे ट्रस्टी बाळासाहेब ननावरे, शांतिनाथ जैन श्वेतांबर मंदिरचे सभासद, बिल्डर्स असोसिएशनचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद, व्यापारी, उद्योजक, लायन्स रोटरी वगैरे स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि शहरवासीय उपस्थित होते.
नवनिर्वाचित सचिव स्वीकार मेहता यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. त्यापूर्वी श्रीमंत संजीवराजे, आ. दिपक चव्हाण, सचिन देशमुख यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आगामी वर्षभरात पूर्ण करण्याची ग्वाही दिली. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
कालिका स्टीलचे श्रीकांत जाधव यांनी यावेळी दर्जेदार स्टील उत्पादन प्रक्रियेविषयी चित्रफितीद्वारे माहिती दिली. आपल्या उत्पादनाचे श्रेष्ठत्व उपस्थितांसमोर ठेवले.