दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | मुंबई | अप्सुजा इन्फ्राटेक ही हैदराबादमधील अग्रगण्य बांधकाम कंपनी आणि सिम्पलीफोर्ज क्रिएशन्स ही थ्री-डी प्रिंटेड कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील कंपनी यांनी वास्तुशास्त्रामध्ये उल्लेखनीय ठरेल अशी जगातील पहिली ‘थ्री-डी प्रिंटेड’ मंदिराची निर्मिती संयुक्तपणे केली आहे. हा प्रकल्प वास्तुशिल्प क्षेत्रात देशात क्रांती घडवून आणणारा आहे.
तेलंगणा राज्यातील सिद्धीपेट येथील बुरुगुपल्ली येथे उभारण्यात येणारे हे ‘थ्री-डी प्रिंटेड’ मंदिर शाश्वत स्वरुपाचे तंत्रज्ञान आणि निसर्गाशी सुसंवाद साधणारी एकात्मता यांची साक्ष देणारे ठरेल. या अतुलनीय कामगिरीच्या निमित्ताने अप्सुजा इन्फ्राटेक आणि सिम्पलीफोर्ज क्रिएशन्स या कंपन्यांनी भारताला ‘थ्री-डी प्रिंटेड आर्किटेक्चर’मध्ये जागतिक अग्रणी म्हणून स्थान मिळवून दिले आहे.
सुमारे ३,८०० चौ. फुटांवर पसरलेले, सुमारे ३० फूट उंचीचे व तीन भागांत निर्माण होणारे हे मंदिर अद्भूत व अद्वितीय वास्तुशिल्पाचा एक आश्चर्यकारक नमुना आहे. या मंदिराच्या संरचनेत तीन गर्भगृहांचा समावेश आहे. यातील पहिले गर्भगृह मोदकाच्या आकारातील असून ते श्रीगणेशाला समर्पित आहे, दुसरे गर्भगृह चौकोनी आकारात असून ते श्रीशंकराला समर्पित आहे, तर तिसरे कमळाच्या आकाराचे असून ते देवी पार्वतीला समर्पित असणार आहे. ‘सिम्पलीफोर्ज’ने आपली अंतर्गत विकसित प्रणाली, स्वदेशी विकसित साहित्य आणि सॉफ्टवेअर यांच्या सहाय्याने या मंदिराची थ्री-डी रचना मुद्रित केली आहे. एवढ्या मोठ्या स्वरुपात पूजास्थळ म्हणून जागतिक स्तरावर उभारली जाणारी ही आतापर्यंतची पहिली थ्री-डी मुद्रित रचना आहे.
सिम्पलीफोर्ज क्रिएशन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव गांधी यांनी सांगितले की “आमच्या उद्योगातील सर्वतोपरी शक्यतांचा एक पुरावा’, या शब्दांत सिम्पलीफोर्ज क्रिएशन्स कंपनीने या प्रकल्पाचे वर्णन केले आहे. “विशेषत: स्थापत्य किंवा सौंदर्यविषयक रचनेमध्ये इन-सिटू प्रिंट करताना 51º आणि 32º आऊटवर्ड आणि इनवर्ड कॅंटिलीव्हरमध्ये मुद्रित करण्याची सिम्पलीफोर्जची क्षमता या रचनेतून सिद्ध होते. या बांधकामात संरचनेच्या आवश्यकता, मंदिराच्या रचनेची तत्त्वे, ‘थ्री-डी प्रिंटिंग’मधील गरजा, ‘इन-सिटू’ बांधकामातील आव्हाने यांचा विचार करण्यात आला. ‘सिम्पलीफोर्ज’च्या भक्कम प्रणालींद्वारे भविष्यात विविध स्वरुपाचे प्रकल्प उभे राहतील, असा विश्वास आम्हाला या प्रकल्पातून मिळाला आहे. दुर्गम सीमा भाग, अति उंचीवरील भूप्रदेश, वाळवंटी आणि हिमवर्षावाचे प्रदेश, आपत्तीग्रस्त क्षेत्रे आणि संरक्षण मंत्रालयाकडील विविध प्रकल्प अशा कोणत्याही ठिकाणी आम्ही प्रकल्प उभारू शकतो, असा आम्हाला आत्मविश्वास आहे.”
“बंदिस्त घुमटाच्या आकाराची संरचना उभारून सपाट स्लॅबच्या छताची गरज आम्ही दूर केली, यातून ‘एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल अॅप्लिकेशन्स’ उभारण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली आहे. ‘सिम्पलीफोर्ज’ला या स्वरुपाचे भव्य काम यापुढेही करावयाचे आहे,” असे गांधी यांनी नमूद केले.
या ऐतिहासिक कामगिरीतून केवळ थ्री-डी मुद्रित बांधकामाची अफाट क्षमताच दिसत नाही, तर ‘सिम्पलीफोर्ज’च्या चमूने विकसित केलेल्या ‘रोबोटिक आर्म सिस्टम’ची आर्किटेक्चरल क्षमतादेखील प्रदर्शित होते. “हे मंदिर संपूर्णपणे प्रत्यक्ष साइटवर तयार केले गेले आहे. यातील मोदक आणि कमळ यांच्या आकर्षक घुमटाकार आकाराची रचना साकारताना, मंदिराच्या तत्त्वांचे पालन करताना, डिझाइनची विशिष्ट तंत्रे वापरताना, मंदिराचे सूक्ष्म विश्लेषण करताना आणि नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धती वापरताना आमच्यापुढे अनेकदा मोठी आव्हाने उभी राहिली. मात्र ती पेलताना आम्ही यशस्वी झालो. यातूनच हा स्थापत्यशास्त्राचा विस्मयकारक चमत्कार उभा राहिला,” असे’ अप्सुजा इन्फ्राटेक’चे व्यवस्थापकीय संचालक हरी कृष्ण जीदिपल्ली यांनी म्हटले.
“शिवालय आणि मोदक यांचे बांधकाम आता पूर्ण झाले असून कमळाकृती घुमट आणि उंच गोपुरम यांचा समावेश असलेला दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे,” असेही हरी यांनी नमूद केले.
जगातील पहिले थ्री-डी प्रिंटेड पूजास्थळ निर्माण करून या दोन्ही कंपन्यांनी मानवी सर्जनशीलता, तांत्रिक पराक्रम आणि स्थापत्य कौशल्य यांचा सुरेख संगम उभा केला आहे. यापूर्वी चारविथा मेडोज येथे भारतातील पहिला ‘थ्री-डी प्रिंटेड ब्रिज प्रोटोटाइप’ त्यांनी वितरीत केला होता. आता ‘थ्री-डी प्रिंटेड मंदिर’ उभारून या कंपन्यांनी, ‘अशा प्रकारचा जगातील पहिला प्रकल्प’ हा बहुमान पटकावला आहे.