दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचे मार्फत राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये शासकीय जागा/संविधान भवनमध्ये अभ्यासिकेची उभारणी विविध शहरे व तालुक्याच्या ठिकाणी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार ५० उमेदवारांची एक अभ्यासिका याप्रमाणे अभ्यासिकांकरिता बार्टी मार्फत पुस्तक व फर्निचर उपलब्ध करून देणार आहे.
अनुसूचित जाती युवकांचे स्वयंसहाय्यता युवा गट, स्थानिक पदाधिकारी माध्यमातून सदर अभ्यासिकांचे सनियंत्रण व देखरेख केले जाणार आहे. तसेच अभ्यासिकेची दैनंदिन कार्यपद्धती / नियमन, नियमित तपासणी, विद्यार्थी निवडीचे निकष याबाबत संबंधित संस्था/यंत्रणा व बार्टी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
अभ्यासिकांची निर्मिती करताना संस्था निवडीमध्ये पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम राहील. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय संस्था यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर अशासकीय संस्था, समाजसेवी/सामाजिक संघटना यांना प्राधान्य देण्यात येईल. सदर संस्था नोंदणीकृत असावी. सदर संस्थेकडून अभ्यासिकेसाठी प्रस्तावित ठिकाण हे मध्यवर्ती व विद्यार्थ्यांना सोईचे असावे. अभ्यासिका या अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरिता निःशुल्क असतील. किमान ५०० पेक्षा जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असणाऱ्या भागातच अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत. अभ्यासिकेकरिता ५० उमेदवारांच्या बैठकीची पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजनेअंर्तगत सातारा जिल्हयातील 500 पेक्षा अधिक अनुसूचित जातींची लोकसंख्या असणारी गावे संविधान भवन, समाज मंदिरे इत्यादी ठिकाणी अभ्यासिका निर्मिती होणार असल्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांनी कळविले आहे.