सोलापूरसह माढा व सातारा लोकसभा काँग्रेसने लढवावी; पदाधिकाऱ्यांची मागणी


दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | फलटण | आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा व सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार देऊन काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवावी अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नुकतीच मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सातारा व सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा, सोलापूर व सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही काँग्रेसने आपल्या चिन्हावर आपले उमेदवार देऊन लढवावी अशी आग्रही मागणी केली आहे.

देशाचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यासोबतच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सातारा, सोलापूर व माढा या लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देऊन या मतदारसंघामधून काँग्रेसने निवडणूक लढवली पाहिजे. आगामी काळामध्ये नक्कीच काँग्रेसचे उमेदवार लोकसभेवर निवडून जातील असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!