
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । सातारा । संपूर्ण भारताच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेमध्ये अमुलाग्र बदल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे देशातील तरुणपिढीचे भवितव्य धोक्यात आले असून, त्यांच्यामध्ये प्रचंड रोष आहे. अग्निपथ योजनेचा निषेध करण्यासाठी कोरेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्याध्यक्ष ऍडव्होकेट विजयराव कणसे, उपाध्यक्ष अविनाश फाळके, जिल्हा सरचिटणीस मनोहर बर्गे, नाजीम इनामदार, तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट श्रीकांत चव्हाण, शेतकरी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, आनंदराव जाधव, सचिन जगताप, जालिंदर भोसले, हमीदभाई पठाण, अमरसिंह बर्गे, जयवंत घोरपडे, ऍडव्होकेट धैर्यशील घारगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या ध्येय धोरणांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुण उपस्थित होते.