
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भारत सरकारला निवेदन सादर
स्थैर्य, सातारा, दि. २८ : कोरोना महामारीच्या संकटाने उग्ररुप धारण केलेले असतांना JEE/NEET परिक्षा घेणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणे आहे. सदर परिक्षा पुढे ढकलण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने आज संपूर्ण देशभर आंदोलन पुकारले होते. त्यानुसार सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले.
जेईई/एनईईटी परिक्षांबाबत गेल्या दोन महिन्यांपासून उलट सुलट चर्चा सुरु असून केंद्र सरकार याबद्दल अत्यंत असंवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर परिक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी आणि पालक योग्यरित्या आंदोलन आणि मागणी करीत असूनही निर्बुद्ध केंद्र सरकार परिक्षा घेण्यासाठी तयारी करीत आहे.
कोविड संकटाच्या वेळी या परीक्षा घेण्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. ऑफलाइन परिक्षेसाठी बसण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडल्यास कोविड-१९ च्या संसर्गामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. मोठी विद्यार्थी संख्या लक्षात घेता परिक्षा केंद्रावर योग्य सामाजिक दुरी (Social Distancing) ठेवणे शक्य होणार नाही त्यामुळे संसर्गाची शक्यता वाढेल तसेच परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी पुरेसी वाहतूक व्यवस्था नाही कारण अजूनही बहूतांश सार्वजनिक सुविधा बंद आहेत आणि हाॅटेल व लाॅज बंद असल्यामुळे लांबून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न गंभीर होईल. या सर्व असुविधांचा व असुरक्षितेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर होऊन ताणतणावाखाली त्याची गुणवत्ता खालावण्याचाही धोका मोठा आहे. कोविड १९ च्या संकटाबरोबरच आसाम आणि बिहारसारख्या राज्यातील भीषण पूर परिस्थितीमुळे तेथील विद्यार्थ्यांना आणखी त्रास होईल.
या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारने JEE/NEET परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी देशातील सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी काल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या आभासी बैठकीच्या वेळी केली आहे. देशभरातील विद्यार्थी, पालक, विरोधी पक्ष व विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी सदर परिक्षेबाबत केलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण देशभर आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांची चिंता विचारात घेऊन जेईई / एनईईटी परीक्षा तहकूब करण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात एनएसयूआय ही काँग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटना देखील केंद्र सरकारच्या एकतर्फी कारवाई विरोधात दिल्लीमध्ये अनिश्चित काळासाठी उपोषण करीत आहे.
केंद्र सरकारच्या या निर्बुद्ध आणि हुकूमशाही निर्णयाला ठोस विरोध करण्यासाठी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर सामाजिक दुरी (Social Distancing) नियमाचे पालण करीत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व केंद्र सरकारला जिल्हाधिकाऱ्यांव्दारे निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, बाबासाहेब कदम, बाबुराव शिंदे, राजेंद्र शेलार, मानाजी घाडगे, शिवराज मोरे, विराज शिंदे, धनश्री महाडिक, नरेश देसाई, एम.के.भोसले, हरिभाऊ लोखंडे, अॅड. धनावडे, बाळासाहेब शिरसाट, मनोज तपासे, अशोकराव गोडसे, आनंदराव जाधव, धैर्यशील सुपले, विक्रांत चव्हाण, रिझवान शेख, अभय कारंडे, नंदाभाऊ जाधव, सादिक अन्वर खान आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.