दैनिक स्थैर्य । दि. ११ सप्टेंबर २०२२ । सातारा । अखिल भारतीय वीमा कर्मचारी महासंघाचे (एआयआयईए) गुजरात , महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांचे म्हणजेच पश्चिम विभागीय प्रतिनिधींचे २३ वे अधिवेशन सातारा येथे येत्या दि. ११ सप्टेंबर ते दि. १३ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. अशी माहिती विमा कर्मचारी संघटनेचे सातारा विभागीय अध्यक्ष कॉ संजय चव्हाण व सरचिटणीस कॉ सर्जेराव भुजबळ यांनी दिली. सातारा येथील हॉटेल सुरूबन येथे उभारलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर मध्ये हे अधिवेशन रविवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनास ३०० प्रतिनिधी या राज्यातून उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्घाटनाच्या सत्रास विविध विभागातील एक हजाराच्या वर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉक्टर अशोक भोईटे यांची निवड झाली आहे . रविवार दि ११ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार असून उद्घाटन सत्रामध्ये अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस कॉ श्रीकांत मिश्रा , अध्यक्ष कॉ व्ही. रमेश , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ.उदय नारकर हे मार्गदर्शन करणार आहेत. आयुर्विमा महामंडळाची साताऱ्यात सुरुवात विमा महर्षी अण्णासाहेब चिरमुले यांनी केली. त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान म्हणून त्यांचे छायाचित्र सभा मंडपात असणार आहे. तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुर्विमा महामंडळाच्या पहिल्या अध्यक्षांना लिहिलेले पत्रही यावेळी प्रदर्शित करण्यात आलेले उपस्थितांना दिसेल. आयुर्विमा महामंडळाच्या बाबत तसेच सार्वजनिक उद्योगांबाबत केंद्र सरकारचे असलेले धोरण तसेच महागाई , बेरोजगारी , खाजगीकरण याबाबत सरकारी अनास्था याबाबत यावेळी विशेष चर्चा होणार आहे. तसेच या अधिवेशनात विशेष बाब म्हणून शंभर महिला प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे खास अधिवेशन होणार आहे त्याला सातारच्या मानसोपचार तज्ञ डॉ. राजश्री देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती कॉ. वसंतराव नलावडे यांनी दिली. अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून विमा कर्मचारी संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.