स्थैर्य, दि.१५: ओबीसी समाजाची भूमिका कायम मराठा आरक्षणाच्या बाजूनेच राहिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची काही हरकत नाही. मराठा समाजामधील ओबीसी गटाला आहे. आमचा विरोध केवळ मराठा आरक्षणात ओबीसी आरक्षण देण्याला आहे. कोणत्याही प्रकारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘महाराष्ट्रात मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले त्यात मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका मांडली गेली. ओबीसी, भटका समाज सर्वांनीच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची काही हरकत नाही. आमचा विरोध केवळ मराठा आरक्षणात ओबीसी आरक्षण देण्याला आहे. कोणत्याही प्रकारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. धक्का लागला तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष होऊ नये, महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम राहावा ही आमची भूमिका आहे,’ असं प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, ‘सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही, ही कल्पना पूर्वीच होती आणि तेच घडलं. ओबीसी आणि मराठ्यांचा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता यापूवीर्ही होती, जे सांगितलं तेच घडलं’. मेगा भारतीचा निर्णय ३० तारखेपर्यंत घेतला गेला पाहिजे. तसंच ओबीसी शिष्यवृत्तीचा ५०० कोटींचा निधी वितरित केला गेला पाहिजे. हॉस्टेलची योजना कार्यान्वित केली पाहिजे अशा अनेक मागण्या प्रकाश शेंडगे यांनी यावेळी मांडल्या.
‘३० तारखेपर्यंत सरकारने ठोस निर्णय घेऊन आम्हाला कळवावं, निर्णय नाही झाला तर आम्हालाही रस्त्यावर उतरुन लढावं लागेल,’ असा इशारा यावेळी त्यांनी दिला.