स्थैर्य, सातारा दि.१९: सातारा दि.19 (जिमाका): सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या कोविड-19 रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यास अधिन राहुन शेखर सिंह, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील क्षेत्रामध्ये ज्या खेळांमध्ये सुरक्षित अंतर राखून खेळता येणारे इनडोअर खेळ उदा. बॅडमिंटन, लॉनअेनिस, टेबल टेनिस, बॉक्सींग इ. खेळांच्या सरावाकरिता खालील मार्गदर्शक सूचना व अटी शर्तींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील क्षेत्रांमध्ये क्रिकेट, खो-खो, इ. मैदानी खेळ तसेच ज्या खेळामध्ये सुरिक्षत अंतर राखून खेळता येणारे इनडोअर खेळ उदा. बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सींग इ. खेळांच्या सरावाकरिता पुढील मार्गदर्शक सूचना व अटींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे. सदर आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी सरावाकरिता आवश्यक तेवढ्याच व मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा व सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकार राहील. वय वर्ष 10 वर्षाच्या आतील मुलांना तसेच 65 वर्षावरील व्यक्तींना प्रवेशास मनाई करण्यात येत आहे. सरावास येणाऱ्या खेळाडू तसेच कर्मचारी यांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात यावी. इनडोअर हॉलमध्ये सराव करताना दारे, खिडक्या उघडी ठेवावीत व ए.सी.चा वापर टाळावा. ए. सी. वापरणे अनिवार्य असल्यास त्या यत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, शक्य असल्यास पोर्टेबल हाय एफीशियंसी एअर क्लिनर बसवावेत. मैदानावर तसेच इनडोअर हॉल येथे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीडा साहित्यांचे वापरण्यापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करणे बंधनकार आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावर तसेच मैदानावर व इनडोअर हॉल येथे ठिकठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी करण्यात यावी. तसेच कर्मचाऱ्यांनी मास्क , ग्लोव्हज, फेसशिल्ड यासारख्या सुरक्षा साधनांचा वापर करावा. संबंधित आस्थापनांनी कोविड-19 संदर्भात लक्षणे नसल्यास खेळाडूंना सरावासाठी प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला यासरखी लक्षणे असल्यास प्रवेश देण्यात येवू नये. काँटॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने सरावास येणाऱ्या खेळाडूंचे नाव, संपर्क क्रमांक, ई मेल आयडी, दिनांक, वेळ इ. माहितीच्या नोंदी दररोज ठेवण्यात याव्यात. काँटॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने खेळांडूंची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देणेबाबत त्यांची ना-हरकत घेण्यात यावी. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने तसेच क्रीडा विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.