स्थैर्य, मुंबई, दि. १२: नाना पटोले यांच्या राजीनाम्याने रिक्त असलेले विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी संख्याबळ टिकवताना सत्ताधारी आणि विरोधक दोघांना जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीत चिंता असून बिनविरोध निवडीचे भाजपने संकेत दिले आहेत.
१ मार्चपासून विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत भरत आहे. अधिवेशनात नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान होते. त्यामुळे मते फुटण्याची दोन्ही बाजूला भीती आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी मिळालेल्या मतांमध्ये घट झाल्यास सत्ताधारी किंवा विरोधकांपैकी एका गटावर नामुष्की ओढावणार आहे. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सरकारने उघड मतदानाद्वारे विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यावेळी सरकारच्या बाजूने १६९, विरोधकांनी बहिष्कार केला तर ४ मते तटस्थ होती. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ असे सत्ताधारी गटाकडे १५४ संख्याबळ आहे. बहुमतासाठी १४५ संख्याबळ हवे असते. मात्र, छोट्या व अपक्षांची १५ मते मिळाल्याने १६९ आकडा महाविकास आघाडी सरकारने गाठला होता. तर भाजपकडे स्वत:ची १०४ मते होती. बहुमताची परीक्षा उघड मताने झाली होती. विधानसभा अध्यक्षपद निवड गुप्त मतदान पद्धतीने होते. माकप, एमआयएम, मनसे हे मागच्या वेळी तटस्थ होते. या वेळी राज्यातील बदललेल्या राजकीय परस्थितीत छोटे पक्ष आपली भूमिका बदलू शकतात. छोट्या पक्षांचे व अपक्षांचे २९ इतके संख्याबळ आहे. तसेच काही भाजपचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी अध्यक्ष निवडीवेळी १७५ चा आकडा पार करेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा दावा आहे.
बिनविरोध निवडीचे संकेत
अध्यक्ष निवड बिनविरोध करण्याची परंपरा आहे. पण, सत्ताधारी यांच्यावर त्याची अधिक जबाबदारी असते, असे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोध निवडीचे संकेत दिले आहेत. कारण, गुप्त मतदान पद्धतीचा लाभ सत्ताधारी गटाला अधिक होत असतो. त्यामुळे विरोधकांना आहे ते संख्याबळ घटण्याची भीती अधिक असते. तशी ती राज्यातील भाजपलासुद्धा आहे. पटोले यांची निवड बिनविरोध झाली होती. या वेळीसुद्धा बिनविरोध होईल. कारण दोन्ही गटाला संख्याबळ टिकवणे व त्यासाठी अनाठायी उठाठेव करण्याची इच्छा नाही.
निवड प्रक्रिया कशी होणार हे गुलदस्त्यात
फ्लोअर टेस्टची जबाबदारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर असणार आहे. अधिवेशनाच्या प्रारंभी की शेवटी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार हे अजून गुलदस्त्यात आहे.
अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप ठरलेले नाही. ते ठरल्यावर सर्वानुमते व्यक्तीची निवड केली जाईल. हे सर्व अधिवेशनाच्या एक ते दोन दिवस अगोदर होईल, असे सांगितले जाते.