दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । कोल्हापूर । शहरातील प्रलंबित असलेले ११६ कोटींचे अमृत योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व जल अभियंता हर्षजित घाटगे यांना केली. ठेकेदार कंपनीने डिसेंबर २०२३ अखेर योजनेचे काम पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी दिली. कोल्हापूर शहरातील अमृत योजनेतून करण्यात येत असलेली कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडली असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ही बैठक मुंबईत घेण्यात आली.
कोल्हापूर शहरासाठी राज्य सरकारकडून अमृत योजनेंतर्गत निधी मिळाला आहे. त्यातून जलवाहिनी तसेच ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम केले जात आहे. दि. १ सप्टेंबर २०१८ ला ठेकेदार कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. काम पूर्ण करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत होती; परंतु या कालावधीत काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर योजनेच्या कामासाठी ठेकेदाराला वारंवार मुदत देण्यात येत आहे; परंतु अद्याप काम पूर्ण झालेले नाही. अमृतचे काम करणारी ठेकेदार कंपनी एकच आहे; मात्र त्यांनी तब्बल १९ उपठेकेदार नेमले आहेत.
परिणामी योजनेची कामे रखडली आहेत. योजनेंतर्गत ३९६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी काही किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे; परंतु खोदाई केलेल्या रस्त्यांचे ठेकेदार कंपनीने रिस्टाेरेशन न केल्याने शहरात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्याबरोबरच अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी १२ टाक्या आणि दोन संप बांधण्यात येणार आहेत; मात्र सर्वच कामे रखडली आहेत.
गेली अनेक वर्षे निधी असूनही योजनेचे काम रखडले असल्याने मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्रशासक डॉ. बलकवडे, जल अभियंता घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.