अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या सूचना


दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। सोलापूर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात निर्माण होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम दि. 15 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. याचबरोबर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी 1 ऑगस्ट 2025 रोजी स्मारक उद्घाटनाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाची पाहणी केली. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत करून त्यांना स्मारक कामाची माहिती दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, सिनेट सदस्य तथा भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्मारक समितीचे सदस्य सर्वश्री माऊली हळणवर, शिवाजी कांबळे, शिवाजी बंडगर, अमोल कारंडे, सोमेश्वर क्षीरसागर, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी स्मारक व विद्यापीठाच्या विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर केले. यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. निधीची कमतरता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून त्यासंदर्भात तरतूद करू. दि. 15 जुलै पर्यंत काम पूर्ण करून 1 ऑगस्ट 2025 रोजी स्मारकाचा उद्घाटन करू, असेही ते यावेळी म्हणाले. विद्यापीठाच्या वनविभागाच्या आरक्षित जागेचा प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी देखील निश्चित मदत करू, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!