ऊर्जामंत्री राऊत यांच्या विमान प्रवासाबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार – विश्वास पाठक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२६: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सरकारी पैशाची उधळपट्टी केल्याप्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात आपण केलेल्या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने आपण मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती ऊर्जा खात्याचे माजी संचालक आणि भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पोलीस आयुक्तांनीही आपल्या तक्रारीची दखल न घेतल्यास आपल्याला न्यायालयात सार्वजनिक हित याचिका दाखल करावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

श्री. पाठक यांनी पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई – नागपूर, 9 जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, दिल्ली असा विमान प्रवास केल्याचे माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीत ‘महानिर्मिती’ने मान्य केले आहे. हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशा पद्धतीने खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. त्यामुळे सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 406,409 अन्वये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावी अशी मागणी करणारा अर्ज आपण वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात 16 मार्च रोजी दाखल केला होता. या तक्रारीची अद्याप दखल घेतली न गेल्याने आपण मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

ऊर्जामंत्री राऊत यांनी बेकायदा पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी दिल्ली, नागपूर, औरंगाबाद, हैदराबाद, मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून मागविली आहे, असेही श्री. पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!