
स्थैर्य, सातारा, दि. 2 : सातार्यातील एका 70 वर्षीय शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्या व्यक्तीच्या डीमॅट अकौंटवरील आजमितीच्या शेअर मार्केटच्या मूल्यांकनानुसार 70 लाख रुपयांचे मूल्य असलेले विविध कंपन्यांचे 7 हजार शेअर्स परस्पर अनोळखी डीमॅट अकौंटवर गिफ्ट म्हणून वर्ग करून फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार सातार्यात घडला. याबाबत आयडीबीआय बँकेचे शाखाप्रमुख तसेच डीमॅट अकौंटचे काम पाहणारे रोहित शिवाजी शेळके, रा. शेळकेवाडी व त्यांचे इतर साथीदार तसेच डीमॅट खात्याच्या व्यवहारांची पडताळणी करणार्या अधिकार्यांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत दत्ता शामराव नरगुंदे (वय 70), रा. यादोगोपाळ पेठ, सातारा यांनी तक्रार दिली आहे. नरगुंदे यांचा 1980 सालापासून शेअर्स खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. युनायटेड वेस्टर्न बँकेत त्यांचे व त्यांच्या पत्नीच्या संयुक्त डीमॅट अकौंट होते. पत्नीच्या निधनानंतर तिचे अकौंट बंद केले. त्यावरील शेअर्स दत्ता नरगुंदे यांच्या अकौंटवर वर्ग झाले. या कालावधीत युनायटेड वेस्टर्न बँकेचे विलीनीकरण आयडीबीआय बँकेत झाले. त्यानंतर नरगुंदे यांचे व्यवहार आयडीबीआय बँकेमार्फत सुरू होते. 2018 साली त्यांच्या डीमॅट अकौंटवरील महाराष्ट्र स्कूटर कंपनीचे 80 शेअर्स कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत बँकेच्या नजरेस ही बाब आणून दिल्यावर चौकशी करतो असे सांगितले. त्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये स्टेटमेंटमध्ये त्यांच्या डीमॅट अकौंटवरील 7 हजार शेअर्स कमी झाल्याचे निदर्शनास आले.
यावेळी डीमॅट अकौंटचे काम पाहणारे रोहित शेळके व त्यावेळच्या शाखाप्रमुखांना नरगुंदे भेटले. मी शेअर्स विक्री न करता शेअर्स कमी होत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केली असता त्यांनी सिस्टिम व्हर्जन बदलले, चौकशी करतो असे सांगितले. यावेळी त्यांनी खात्याच्या स्टेटमेंटची प्रिंटही दिली व सर्व शेअर्स जसेच्या तसे असल्याचे सांगितले. त्या स्टेटमेंटमध्ये शेअर्सची संख्या कमी झाली नव्हती. मात्र नरगुंदे यांना शेअर्सचा लाभांश कमी येत होता. त्यावर त्यांनी एशियन पेंटस कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीने बँकेशी संपर्क साधा असे पत्र पाठवले.
एकूणच प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी नरगुंदे यांनी बँकेकडे डीमॅट स्लीपची मागणी केली. त्यात त्यांचे विविध कंपन्याचे शेअर्स 7 हजार शेअर्स गिफ्ट केले असल्याचे समोर आले. हे शेअर्स नरगुंदे यांनी गिफ्ट केलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या खात्याबाबत आयडीबीआय बँकेतील डीमॅटचे व्यवहार पाहणारे रोहित शेळके व शाखाप्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली नाही. त्यावर नरगुंदे यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर फेब्रुवारी 2020 मध्ये रोहित शेळके याने फोन करून त्यांना भेटण्यास येतो सांगितले. तुमच्या शेअर्सची मी अफरातफर केली असून त्यांचे पैसे सवडीने देतो असे सांगितले. याबाबत त्याच्याकडे लेखी मागितले असता त्याने दिले नाही उलट कोठेही तक्रार करू नका असा सल्ला दिला.
या सर्व प्रकारानंतर 2 जुलै रोजी दत्ता नरगुंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत रोहित शेळके, बँकेचे शाखाप्रमुख, त्यांचे सहकारी व डीमॅट अकौंटची पडताळणी करणारे अधिकारी यांच्यावर फसवणुकीची तक्रार दाखल केली असून त्या संदर्भातील सर्व पुरावे त्यांनी तक्रारीसोबत जोडले आहेत. या प्रकारामुळे सातारा शहरासह बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.