दैनिक स्थैर्य | दि. १ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी या परीक्षांची तयारी केवळ एक परीक्षा आहे म्हणून वरवरची न करता, ते आपल्या जीवनाचे ध्येय आहे असे मानून खूप बारकाव्याने, आत्मविश्वासाने करणे गरजेचे आहे, असे विचार फलटणचे उपविभागीय अधिकारी श्री. सचिन ढोले यांनी व्यत केले.
फलटणच्या मुधोजी महाविद्यालयामधील इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या ‘एका सरकारी अधिकार्यांशी चर्चा’ या कार्यक्रमांमध्ये ‘स्पर्धा परीक्षा : युवा पिढीसाठी एक आव्हानात्मक संधी’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इंग्लिश विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांनी केली.
या विशेष मार्गदर्शन पर व्याख्यानामध्ये सचिन ढोले यांनी स्पर्धा परीक्षेचे प्रीलीम, मेन्स, मुलाखती या विविध टप्प्यांवर नेमके काय करणे गरजेचे आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा हे करिअरचे एक उत्तम; परंतु तितकेच आव्हानात्मक माध्यम आहे, जो विद्यार्थी सातत्यपूर्ण वृत्तपत्रांचे वाचन, त्यामध्ये आलेल्या बातम्यांचे पृथ:क्करण व त्यावर स्वत:चे मनन, चिंतन करून नोट्स काढतो, स्वतःतील चौकस बुद्धी, शोधक नजर जागृत ठेवतो व समाजामध्ये घडणार्या प्रत्येक घटनेच्या पाठीमागे असणारा कार्यकारण भाव समजावून घेतो, त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित यश मिळते. हा मुद्दा स्पष्ट करताना श्री. सचिन ढोले यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त फ्रान्सच्या अध्यक्षांचं भारतातील आगमन यासारख्या घटनांशी स्पर्धा परीक्षेशी निगडित असंख्य प्रश्न असू शकतात, याची उदाहरणे दिली.
समाजात घडणार्या कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागे विविध भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक असे विविध संदर्भ असू शकतात व त्यावर प्रश्न येऊ शकतात. याबाबत विद्यार्थ्यांनी चौकसपणे त्याचा शोध घेतला पाहिजे. आपली स्वतःची एक लेखनशैली विकसित केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून त्या विद्यार्थ्यांचा एकूणच दृष्टिकोन, प्रश्न सोडवण्याची क्षमता, व्यक्तिमत्त्वाचा कल अशा अनेक बाबी लक्षात येतात. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी एखादा क्लास लावलाच पाहिजे, असे नाही तर स्वयं अभ्यास ही याची गुरुकिल्ली आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. स्वतःची तुलना अन्य कुणाशी न करता आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये जे चांगले किंवा न्यून आहे त्याचा शोध घेऊन त्यामध्ये वृद्धी किंवा ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. तारुण्याचे हे वय कोणत्याही क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करण्याचे असते, याची जाणीव ठेवावी. पदवीनंतर तीन-चार वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असाच झोकून देऊन केला तर यश तुमच्यापासून फार दूर नाही, अशी खात्री सचिन ढोले यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा हे करिअर करण्याचे एक उत्तम माध्यम बनले आहे, असे सांगितले. पूर्वी या परीक्षांमध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी प्रामुख्याने शहरी किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी असणारे असायचे, पण आता मात्र अगदी खेड्यापाड्यातील विद्यार्थी स्वतःच्या कष्टाच्या जीवावर स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी म्हणून प्रशासनामध्ये उत्तम काम करत आहेत. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये सर्वांची प्रगती हे ध्येय ठेवून प्रशासनातील अधिकारी व निवडणुकीतून आलेले पदाधिकारी यांनी समन्वयाने काम केले तर देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. माझ्या राजकीय कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात टी. चंद्रशेखर यांच्यासारख्या अधिकार्यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रशासन कसे चालते, त्यामध्ये विधायक बदल कसे घडवून आणता येतील, याबाबत प्रशिक्षणच मिळाले, अशी आठवणही त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करू इच्छितात, त्यांना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सर्व ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आभार प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी मानले तर निवेदन प्रा. डॉ. सीता जगताप यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्राध्यापक व बीए, बीकॉम तृतीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना आपल्या मनातील विविध शंका विचारल्या व त्यांनीही मनमोकळेपणे या सर्व शंकांची उत्तरे दिली. या कार्यक्रमामुळे स्पर्धा परीक्षांविषयी आम्हाला अनेक गोष्टी ज्ञात झाल्या व आम्हाला नेमके काय केले पाहिजे, याची दिशा मिळाली, असे उद्गार अनेक सहभागी विद्यार्थ्यांनी काढले.
इंग्लिश विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून दाद दिली.