दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जिल्हयातील विविध नगरपालिकांमध्ये नोकरीत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱयांच्या वारसांनी सन 2004 पासून ते 2021 पर्यंत अनुकंपा तत्वाखाली पालिकांच्या सेवेत सामावून घेण्यासाठी अर्ज केलेले असताना अद्याप त्यांना न्याय न मिळाल्याने कराड, वाई, सातारा, म्हसवड, महाबळेश्वर पालिकांमध्ये अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हयातील विविध नगरपालिकांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱयांच्या वारसांना अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळण्यासाठी विनंती अर्ज केलेले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे प्रस्तावही सादर करण्यात आलेले असून त्यानुसार अनुकंपा नियुक्ती उमेदवारांची प्रतिक्षा सुचीही तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील विविध पालिकांमध्ये वर्ग 3 मधील 17, वर्ग 4 मधील 69 कर्मचारी अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र आहेत. 18 मार्च 2021 च्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱयांनी रिक्त असलेल्या पदासाठी नगरपरिषदांना नावे कळवून संबंधित मुख्याधिकाऱयांनी अनुकंपा तत्वावर
नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ही नियुक्ती सुची अद्यापही प्रलंबित आहे. यातील अनेक कर्मचारी 2004 ते 2021 या कालावधीत अर्ज केलेले आहेत. त्यातील काहींना अद्याप नोकरी न मिळाल्याने त्यांची वये वाढत असून त्यांना वेळेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती न दिल्यास पुन्हा त्यांना कोठेही नोकरी मिळणार नाही. आदेश देवून वर्षभराचा कालावधी लोटला तरी नियुक्ती न दिल्याने शेवटी या उमेदवारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
यामध्ये कराड पालिकेत अर्ज केलेले शाम थोरवडे, शुभम कांबळे, संदीप कांबळे, अमित थोरवडे, धीरसिंग चावरे, नागेश गोसावी, किरण माने, वाई पालिकेत अर्ज केलेले राहूल लाखे, प्रमोद जाधव, महेश लाड, वैभव कळके, जगदीश मुळे, सातारा पालिकेत अर्ज केलेले कैलास अडागळे, अनिल बडेकर, संतोष माने, संदीप घाडगे, सतीश माने यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.